28 October 2020

News Flash

राज्यात विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी

धोक्याची जाणीव करून देण्याचा उद्देश

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य

महाराष्ट्रात करोना वेगाने पसरत असताना राज्याच्या आरोग्य विभागाने आता कोणत्याही पानविडी दुकानात तसेच अन्य कोणत्याही ठिकाणी  सिगारेट किंवा सिगारेट सुटी विकायला बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश आरोग्य विभागाने जारी केला आहे. त्याची अंमलबजावणी महापालिका, पोलिसांनी करायची आहे.

राज्यात शाळा – महाविद्यालयांतील तरुणाई मोठय़ा प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी गेली आहे.  आरोग्य विभागाने यापूर्वी सिगारेट व विडीची सुटी विक्री होऊ  नये यासाठी विधी व कायदा विभागासह सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा  केला होता. मात्र विधी विभागाकडून पुरेसे पाठबळ न मिळाल्याने आरोग्य विभागाला याबाबत आदेश काढता आला नव्हता, असे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, युती शासनाच्या काळात शाळा- महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी लागू करण्यात आली. मात्र आजही त्याची ठोस अंमलबजावणी कोणताही संबंधित विभागाने केलेली नाही.  महत्त्वाचे म्हणजे याबाबतच्या केंद्राच्या कायद्याचे पालन महाराष्ट्रात कायदा अस्तित्वात आल्यापासून कधीच करण्यात आले नाही. ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) या अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करताना पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा विडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश स्पष्ट शब्दात छापणे बंधनकारक आहे. सिगारेट पाकीट अथवा विडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे, आरोग्याच्या धोक्याची कल्पना,  हा साध्य होतो. मात्र  पाकिटातून एक-एक सिगारेट, विडी काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही. अनेक राज्यांनी याच मुद्दय़ावर विडी-सिगारेट सुटी विकण्यावर बंदी घातली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे हेसुद्धा महाराष्ट्रात असा आदेश निघावा यासाठी आग्रही होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हा आदेश जारी करताना सर्व कायदेशीर बाजू तपासून पाहिल्या तसेच हा आदेश साथरोग कायदा आदींशी संदर्भित केला आहे.

‘तरुणाईच्या भल्यासाठी’

यापुढे सिगारेट वा विडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट वा बंडल विकत घ्यावे लागणार  आहे. प्रामुख्याने मोठय़ा प्रमाणात व्यसनाकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठीच हा आदेश काढल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.  महाविद्यालयीन तरुणच नव्हे, तर तरुणीही अगदी सहजपणे सिगारेट ओढताना दिसतात. तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ती सर्व पावले आरोग्य विभाग उचलेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:29 am

Web Title: ban on sale of vdcigarette holidays in the state abn 97
Next Stories
1 मुंबईत लशीच्या आजपासून चाचण्या
2 करोनाच्या स्थितीबाबत डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा
3 राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची प्रतीक्षाच!
Just Now!
X