19 February 2019

News Flash

पेपरमध्ये वडापाव बांधून देण्यावर बंदी येणार?

मुंबई पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार विषय

मुंबईकरांच्या पोटाला आधार असणारा वडापाव कागदामध्ये बांधून देणं काही नवीन नाही. मात्र लवकरच कागदात वडापाव, भजी असे पदार्थ बांधून देण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. असे खाद्यपदार्थ अनेकदा जुन्या रद्दीतील वर्तमानपत्रांमध्ये बांधून दिले जातात. त्या वर्तमानपत्रांवरील शाई आरोग्यासाठी धोकादायक असल्याने ही पद्धत बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लवकरच हा कागद बंदीचा निर्णय मुंबई महानगरपालिकेत महासभेमध्ये चर्चेसाठी आणला जाणार आहे.

मुंबईत अनेक खाऊ गल्ल्या आहेत तसेच कॉर्पोरेट ऑफीसेस, लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या आजूबाजूला अनेक गाड्यांवर वडापाव, पॅटीस, भजी, समोरे, पुरी भाजी असे पदार्थ मिळतात. अनेकदा गाड्यांवरूनच या पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याने स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात नाही. ‘फास्टफूड’ प्रकारात मोडणारे हे तळलेले पदार्थ विक्रेते सर्रास वृत्तपत्रांमध्ये बांधून देण्यात येतात. पदार्थ गरम असताना त्यातील तेलामुळे  या वृत्तपत्रांवरील शाई खाद्यपदार्थांना लागते. वृत्तपत्रांवर छापण्यात येणाऱ्या मजकुरासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत ‘ग्राफाइट’ नावाचा अत्यंत विषारी घटक असतो. तो या पदार्थांमार्फत लाखो मुंबईकरांचा पोटात जातो. ‘ग्राफाइट’मुळे कर्करोग होण्याची शक्यता बळावते. त्यामुळेच अशाप्रकारे कागदांमध्ये खाद्यपदार्थ बांधून देण्याच्या पद्धतीवर त्वरीत बंदी आणावी अशी मागणी शिवसेनेचे वरळीतील विभागप्रमुख आणि नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी केली आहे. रोगांच्या प्रसारास प्रतिबंध आणि आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हे मुंबई महापालिकेचे आवश्यक आणि बंधनकारक कर्तव्य असल्याचे महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदींमध्ये नमूद करण्यात आल्याचे चेंबूरकर यांनी महापालिकेला सांगितले.

पदार्थांतील तेल निथळण्यासाठी वर्तमानपत्र वापरताय? सावधान!

थेट मुंबईकरांच्या आरोग्याशी हा विषय संबंधीत असल्याने चेंबूरकर यांची ही ठरावाची सूचना लवकरच मुंबई पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. महासभेने या ठरावाला मंजुरी दिल्यास ही सूचना पुढे पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येणार आहे.

काय धोका असतो कागदामध्ये बांधलेले तेलकट पदार्थांचे सेवन करण्यात…

– मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्रॅफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता जास्त असते.

– शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतु ग्रॅफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो.

– वर्तमानपत्राच्या शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सचे संतुलन बिघडविते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो.

– वर्तमानपत्रापेक्षा मासिकाचा कागद जाड तसेच ग्लॉसी असतो. त्यामुळे तो तेल निथळण्यासाठी जास्त चांगला असे आपल्याला वाटते. परंतु हा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक आरोग्यासाठी अधिक धोकादायक असतात.

– तेलकट पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.

– टिश्यू पेपर अथवा पेपर टॉवेल घाऊक बाजारातून विकत घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हाला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कोरा कागद वापरा.

 

First Published on October 6, 2017 12:18 pm

Web Title: ban on use of newspaper for wrapping vada pav bhaji subject to be discuss in mumbai bmc