18 January 2019

News Flash

प्लास्टिकबंदीने खाद्यविक्रेत्यांची पंचाईत

प्लास्टिकबंदीचा सर्वाधिक फटका खाद्यपदार्थ बांधून देणाऱ्या विक्रेत्यांना बसला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दूध, लस्सी, मिसळ, सांबार, चटणी घरपोच देताना अडचणी

राज्य सरकारचा प्लास्टिकबंदीचा निर्णय उच्च न्यायालयानेही अबाधित ठेवल्याने येत्या काळात खाद्यपदार्थ विक्रेते आणि त्यांच्याकडून घरी खाद्यपदार्थ मागवणाऱ्या खवय्यांना सर्वाधिक गैरसोयींना तोंड द्यावे लागणार आहे. दूध, लस्सी, मिसळ, सांबार, चटणीसारखे पातळ पदार्थाची घरपोच सेवा देताना प्लास्टिक  पिशव्या किंवा प्लास्टिकचे झाकण असलेले ग्लास यांशिवाय अन्य पर्याय व्यवहार्य ठरत नाही, तर कोरडय़ा पदार्थाकरिता अ‍ॅल्युमिनिअमचे आवरण असलेले वापरून टाकून देता येण्यासारखे डबे किंवा अ‍ॅल्युमिनिअमचेच पातळ फॉइलसारखे उपलब्ध असले तरी त्यातून पदार्थ नेणे ग्राहकांना कितपत आवडेल याविषयी दुकानदारांमध्ये साशंकता आहे. अ‍ॅल्युमिनिअमच्या पातळ डब्यांचा पर्याय महागडा ठरत असल्याने पदार्थाची किंमत वाढवावी लागणार आहे. परिणामी खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. काहींना याचा परिणाम व्यवसायावर होण्याची भीती सतावत आहे.

खाद्यपदार्थ विक्रेते खासकरून मिसळ, लस्सी, फळांचे रस, सांबार, चटणी आदी पातळ खाद्यपदार्थाची विक्री करणारे दुकानदार प्लास्टिकबंदीच्या निर्णयामुळे चिंतेत आहेत. मिठाईच्या दुकानांमधून लाडू-पेढय़ांसारखे कोरडे पदार्थ कागदी खोक्यांमध्ये भरून देता येतात. परंतु, गुलाबजाम, रसमलाई, लस्सी, श्रीखंड यांसारख्या पदार्थाकरिता प्लास्टिकचे ग्लास किंवा गोलाकार डब्यांचा वापर सोयीचा ठरतो. आता या वस्तू बांधून देताना दुकानदारांची पंचाईत होते आहे. बंदीमुळे प्लास्टिक उत्पादकांनीच या वस्तूंचे उत्पादनच बंद केले आहे. त्यामुळे आता ते बाजारात उपलब्धही नाही.

वडाळा रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या प्रसिद्ध ‘ब्रिज अलबेला’ या मिठाई विक्रेत्यांना लस्सी, आमरस आणि श्रीखंड या पदार्थाच्या विक्रीसाठी नेमके काय वापरायचे, असा प्रश्न पडला आहे. ‘उन्हाळा सुरू असल्याने आमरसला मोठी मागणी आहे. मात्र प्लास्टिकचे डबे मिळत नसल्याने सध्या आम्ही जाडसर कागदी डब्यांचा पर्याय आजमावला आहे. मात्र आमरसासारख्या पातळ पदार्थाकरिता कागदी डब्यांचा पर्याय व्यवहार्य ठरत नाही,’ असे ‘ब्रिज अलबेला’चे मालक जयेशभाई यांनी सांगितले. आता अक्षय्य तृतीया येत असल्याने श्रीखंडला मागणी असेल. मात्र प्लास्टिकच्या डब्यांऐवजी ग्राहकांना त्या दिवशी कागदी डब्यांमधूनच श्रीखंड भरून द्यावे लागेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही थोडीफार अशीच पंचाईत झाली आहे. सांबार, नारळाची चटणी असे पातळ पदार्थ घरी बांधून देताना प्लास्टिकच्या डब्यांचा किंवा पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. पण आता हे पदार्थ कशामधून बांधून द्यावे, असा प्रश्न निर्माण झाल्याचे ‘श्री अय्यपन’ दुकानामधील एका कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे ग्राहकांना पदार्थ बांधून देणे बंद केल्याचे त्याने सांगितले. अ‍ॅल्युमिनियमच्या पातळ कागदातून फार तर इडली, मेदू वडे बांधून देणे शक्य आहे. मात्र त्यापासून बनवण्यात आलेल्या डब्यांमधून सांबार-चटणी सारखे पातळ पदार्थ देता शक्य नसल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. प्लास्टिकबंदीमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे माटुंगा येथील दक्षिण भारतीय पदार्थाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

प्लास्टिकबंदीचा सर्वाधिक फटका खाद्यपदार्थ बांधून देणाऱ्या विक्रेत्यांना बसला आहे. कार्यालयांच्या परिसरात असणाऱ्या पोळी-भाजी केंद्रातील भाज्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून दिले जात होते. इथल्या एका नामवंत मिसळीची चव चाखण्यासाठी तर ठाणेकर चांगलीच गर्दी करत. मात्र पूर्वसूचना न देता लागू करण्यात आलेल्या या प्लास्टिकबंदीमुळे नेमकी या खाद्यपदार्थाची विक्री करायची कशी, या पेचात खाद्यपदार्थ विक्रेते पडल्याचे चित्र ठाणे शहरात पाहायला मिळत आहे. ठाणे शहराबरोबरच डोंबिवली, कल्याणसारख्या शहरातही परिस्थिती काही वेगळी नाही. प्लास्टिकबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कारवाई होऊ नये यासाठी काही विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जिन्नस देणे बंद करण्यात आले होते. मात्र निर्णयाचा प्रभाव ओसरल्यावर ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्ये लघू खाद्य उद्योजकांकडून आजही सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत आहे.

प्लास्टिकच्या ग्लासातून ताक, पन्ह्य़ाची छुपी विक्री

जांभळीनाका, गावदेवी परिसरात ताक, पन्हे अद्याप प्लास्टिकच्या ग्लासातून विकले जात आहे. कारवाई होऊ नये यासाठी एखाद्या आडोशाला ही विक्री सुरू आहे.

बिर्याणीसाठी अन्य पर्याय नाही

बिर्याणीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही प्लास्टिकबंदीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोहळे आणि पाटर्य़ामध्ये बिर्याणी पोहोचविण्यासाठी प्लास्टिकच्या डब्यांचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. अ‍ॅल्युमिनिअमच्या कागदातून बिर्याणी देता येणे शक्य आहे. मात्र ग्राहकांना हा पर्याय मान्य नाही, असे बिर्याणी विक्रेते मनसुख दिलावर यांनी सांगितले. शिवाय उच्च प्रतीच्या अ‍ॅल्युमिनिअम आवरण असलेल्या डब्याचा पर्याय महागडा ठरतो, याकडे बिर्याणी विक्रेते फरीद शहा यांनी लक्ष वेधले.

ठाण्यातील विक्रेत्यांनी धोरण स्वीकारले

ठाण्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू केल्यावर सुरुवातीच्या काळात कारवाईच्या भीतीपोटी ठाण्यातील खाद्यविक्री करणाऱ्या लघू उद्योजकांनी प्लास्टिक वर्ज्य करण्याची तयारी दाखवली तरी आता या निर्णयाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी पाहून त्यांनी तूर्त काही प्रमाणात का होईना प्लास्टिक शरण धोरण स्वीकारले आहे. प्लास्टिकबंदी लागू करण्यापूर्वी त्याला पर्याय शोधण्यात न आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

First Published on April 17, 2018 4:20 am

Web Title: ban on use of plastic bags hits food delivery businesses