करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होऊ नये, यासाठी समुद्रात गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी मुंबईतील नामवंत डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे के ली आहे. घरगुती किंवा सार्वजनिक गणशोत्सवातील गणपती मूर्तीचे फक्त कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती करावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

या संदर्भात पद्मभूषण डॉ. एन.ए. लाड, पद्मभूषण डॉ. आर.डी. लेले, डा. रविन थत्ते, डॉ. शैला व्ही. पालेकर व डॉ. सुनील जी. दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. गणेशोत्सवाच्या काळात करोना संसर्ग वाढण्याचा धोका संभवतो, त्याला प्रतिबंध करण्यासाठी, संबंधित यंत्रणेला मदत होईल, अशा काही विधायक  सूचना केल्या आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्य शासनाने व मुंबई महापालिका प्रशासनाने लोकांना खबरदारी घेऊन, गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे, परंतु त्यामुळे करोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मुंबईतील एकूण २ लाख ३० हजार गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी १ लाख ९८ हजार मूर्तीचे समुद्रात व ३३ हजार मूर्तीचे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ३२ कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. हे आकडे पाहता समुद्रावर, तलावांवर विसर्जनासाठी गर्दी होणारच. त्यामुळे करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होऊ शकेल. त्याचा वैद्यकीय पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडेल. मुंबईकर व करोना योद्धा म्हणून लढणारे डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या चार महिन्यांपासून सर्वसंबंधितांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे करोना नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत असताना, पुन्हा त्याचा विस्फोट झाला तर, सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरणार आहे. हा धोका लक्षात घेऊन, समुद्रात व तलावांमध्ये गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी घालावी, अशी विनंती डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

कृत्रिम तलावांची मागणी

महापालिकेने मुंबईत गणेश विसर्जनासाठी किमान २५० ते ३०० कृत्रिम तलाव तयार करून द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. धर्मस्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांचा जीव धोक्यात घालू नये, असे डॉ. रविन थत्ते यांनी म्हटले आहे.

महापौरांच्या भावाचे करोनाने निधन

महापौर किशोरी पेडणेकर यांचे ज्येष्ठ बंधू सुनील कदम यांचे शनिवारी सकाळी करोना संसर्गाने निधन झाले.  ते ५९ वर्षांचे होते. कदम यांच्यावर मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालायत उपचार सुरू होते. गेल्या आठवडय़ात त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती खालावत जाऊन शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.