मुंबईतील वांद्रे (पूर्व) आणि सांगलीतील तासगाव-कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात होणा-या पोटनिवडणूकीसाठी आज मतदान घेण्यात आले. पाच वाजेपर्यंत वांद्रे (पूर्व) येथे सरासरी ४० टक्के आणि तासगावमध्ये ४३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
लोकांची भावना मला आमदार बनवण्याची आहे, असं माजी उद्योगमंत्री नारायण राणे म्हणाले. मतदान उत्साहात सुरू असून, चांगलं मतदान होईल आणि माझ्यासाठी सकारात्मक निकाल असेल, असंही ते म्हणाले. तर लोकांवर आमचा विश्वास असून शिवसेना, आरपीआय आणि भाजपचा हा गड कायम राखेल असा आम्हाला विश्वास आरपीआय नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला.  
शिवसेना तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून वांद्रे येथे माजी उद्योगमंत्री नारायण राणे रिंगणात असल्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या पोटनिवडणुकांकडे लागले आहे.  
शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत वांद्रे (पूर्व) आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (तासगाव कवठेमहांकाळ) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर दिवंगत आमदारांच्या पत्नी अनुक्रमे तृप्ती सावंत (सेना) आणि सुमन पाटील (राष्ट्रवादी) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वांद्रे (पूर्व) मतदारसंघातून दहा तर तासगाव कवठेमहांकाळ येथून नऊ उमेदवार रिंगणात आहेत. राणे यांनी ७२ कोटी तर तृप्ती सावंत यांनी दोन कोटी मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. एमआयएमचे रेहभार खान यांनी सहा कोटी मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. सुमन पाटील यांची मालमत्ता एक कोटी आहे. या निवडणुकीतील आठ उमेदवार कोटय़ाधीश आहेत. ११ उमेदवार पदवीधर तर उर्वरित आठ उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा कमी शिकलेले आहेत.
वांद्रे मतदारसंघात सात तर तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात दोन उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉम्र्स या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.