20 September 2020

News Flash

वांद्र्य़ात अटीतटी, तणातणी आणि पोलीस कारवाई..

वांद्रे मतदारसंघातून काँग्रेसतर्फे पोटनिवडणूक लढविणारे नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नीतेश राणे यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

| April 12, 2015 04:42 am

वांद्रे मतदारसंघातून काँग्रेसतर्फे पोटनिवडणूक लढविणारे नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नीतेश राणे यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. वांद्रे पूर्व परिसरात फिरणारे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र काही काळानंतर या तिघांनाही पोलिसांनी सोडून दिले. दरम्यान, आपल्या मुलांवर आकसापोटी कारवाई करण्यात आली असून एकाही मंत्र्याला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता.
वांद्रे पूर्व मतदारसंघातील ही पोटनिवडणूक शिवसेना आणि नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मतदानाच्या दिवशी शनिवारी नारायण राणे यांचे पुत्र नीलेश आणि नीतेश हे दोघेही सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन या मतदारसंघात फिरत होते. खारच्या गोळीबार परिसरात सुरक्षारक्षकासोबत सकाळच्या वेळी फिरत असलेले नीतेश राणे यांना पोलिसांनी हटकले आणि तात्काळ ताब्यात घेतले. त्याचवेळी कार्यकर्त्यांसोबत मोटारसायकलवरून फिरणारे नीलेश राणे यांना वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले. आपल्या पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच नारायण राणे यांनी थेट खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मतदारसंघात फिरणारे विनायक राऊत यांनाही खेरवाडी शिवसेना शाखेबाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना निर्मलनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
शिवसेना सत्तेचा गैरवापर करीत असून हे कदापि खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मतदारसंघात फिरत आहेत. मग नीलेश आणि नीतेशलाच का ताब्यात घेतले. अशा पद्धतीने पोलीस गळचेपी करीत असतील तर संध्याकाळपर्यंत वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता. या प्रकारामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दुपारी नीलेश, नीतेश राणे, विनायक राऊत यांना पोलिसांनी सोडून दिले. त्यानंतर तणाव निवळला. दुपारी साडेचारच्या सुमारास शिवसेना आमदार राजन साळवी यांना निर्मलनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन सव्वा पाचच्या सुमारास सोडून दिले.

भाजप कार्यकर्ते गायब!
*विधानसभेत नारायण राणे डोईजड होऊ नयेत आणि एमआयएमचा वारू रोखला जावा या उद्देशाने भाजपने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला मात्र मतदानाच्या दिवशी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मात्र मतदारसंघात कुठेच आढळले नाहीत.
*त्यामुळे शिवसैनिकांमध्ये भाजपबद्दल नाराजी व्यक्त होत होती. वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये भाजपने आपला उमेदवार न उतरविता शिवसेनेने रिंगणात उतरविलेल्या तृप्ती सावंत यांना पाठिंबा जाहीर केला. परिणामी, गेल्या काही दिवसांमध्ये उभय पक्षांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाला पूर्णविराम मिळेल अशी शिवसैनिकांना आशा होती.
*पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजपचे नेते सोडा पण स्थानिक कार्यकर्तेही मतदारसंघात दिसत नव्हते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
*मतदारांना मतदानासाठी उतरविण्यासाठी शिवसैनिक घरोघरी फिरत होते. यावेळी भाजप कार्यकर्ते सोबत असते तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया काही शिवसैनिक व्यक्त करीत होते.

चार लाखांची रोकडही जप्त
वांद्रे येथे शनिवारी झालेल्या पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वांद्रे-कुर्ला पोलिसांनी शुक्रवारी शुक्रवारी चार लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी वांद्रे येथील वाल्मिकी नगर येथे एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तर गुरुवारी रात्री या मतदार संघात रत्नागिरीहून आलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी निवडणुकीच्या दिवशी पोलिसांनी मतदार संघातील सात संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, वाहतुक पोलीस असा सुमारे अडीच हजार पोलिसांचा ताफा मतदार संघात तैनात करण्यात आला होता. लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक काळात मोठी रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तिंची निवडणूक यंत्रणेने मोठय़ा प्रमाणात धरपकड केली होती. पोटनिवडणुकीत अशी रोकड बाळगण्याचे एकच प्रकरण उघड झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 4:42 am

Web Title: bandra east by poll
टॅग Narayan Rane
Next Stories
1 धास्तावलेले शिवसैनिक स्थानिकांच्या आश्रयाला
2 नवी मुंबईत ५६८ उमेदवार रिंगणात
3 ‘सेझ’च्या जमिनीचा घास बिल्डरांच्या घशात?
Just Now!
X