अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शनिवारी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असे वातावरण ‘राणे आणि शिवसेना स्टाइल’ने चांगलेच तापले होते. राणे यांचे दोन्ही मुलगे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, या लढाईकडे बहुतांश मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. अवघे ४२ टक्के मतदान झाल्याने वांद्रे कोणाचे, हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. आता बुधवारी, १५ एप्रिलला निकालाच्या दिवशी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
 दरम्यान, तासगाव कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीसाठी सुमारे ५८ टक्के मतदान झाले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी शांततेत मतदान झाले. शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे नारायण राणे यांनी अर्ज दाखल केला तेव्हापासूनच या मतदारासंघातील वातावरण तापू लागले होते. त्यातच एमआयएमने सिराज खान यांना उमेदवारी दिल्यामुळे राणे यांनी आपली सर्व ताकद मतदारसंघात लावली. त्यामुळे शिवसेनेनेही येथे लक्ष केंद्रित केले होते. शनिवारी शिवसैनिक अधूनमधून घोषणाबाजी करीत असल्यामुळे काही परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अल्पसंख्याकांच्या वस्त्यांमध्येही त्यांच्या फेऱ्या सुरू होत्या. काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयांबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती. परंतु शिवसैनिकांप्रमाणे त्यांच्यात उत्साह दिसत नव्हता. जागोजागी मांडलेल्या टेबलांवर आचारसंहिता धाब्यावर बसवून झेंडे, बॅनर्स झळकविले होते. आता कौल कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
*वांद्रय़ातील प्रचारात शिवसेना, काँग्रेस व एमआयएमने वातावरण ढवळून काढले असले तरी त्याचा परिणाम मतदानावर झाला नाही. दुपापर्यंत २३ टक्के मतदान झाले तर सायंकाळपर्यंत ते ४२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले.
*भाजपने शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले व मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या असल्या तरी शनिवारी भाजपचे कार्यकर्ते व नेते दिसत नव्हते.
*शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेचे बहुतेक नेते मतदारसंघात प्रचारासाठी तळ ठोकून होते.
*मुस्लीमबहुल वस्त्या वगळता एमआयएमची उपस्थिती जाणवत नव्हती.