एमआयएमला मत म्हणजे शिवसेनेला मदत हा काँग्रेसचा प्रचार, तर मुस्लीम मतांमध्ये फूट पडू नये म्हणून एमआयएमची व्यूहरचना आहे. जास्तीत जास्त मुस्लीम मते एमआयएमच्या परडय़ात पडावी, असा mu04शिवसेनेचा प्रयत्न. सुमारे ८० हजारांच्या आसपास असलेल्या मुस्लीम मतांना वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘मातोश्री’च्या अंगणातील ही पोटनिवडणूक काँग्रेसचे नारायण राणे आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. राणे यांच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई आहे. प्रत्येक पक्षाने मुस्लीम मतांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. ‘एमआयएम’ने राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाळेमुळे रोवली. अल्पसंख्याक मतदारांनी एमआयएमला आपलेसे केले. या पाश्र्वभूमीवर वांद्रे पूर्व मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राहावे म्हणून एमआयएम पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. गेल्या वर्षी या मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराला २४ हजार मते मिळाली होती. या पोटनिवडणुकीनंतर लगेचच औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आहे. वांद्रे पूर्वमध्ये अल्पसंख्याकांनी एमआयएमला नाकारल्यास त्याची प्रतिक्रिया औरंगाबादमध्ये उमटू शकते. यामुळेच एमआयएमचे औवेसी वांद्रे पूर्व मतदारसंघातील मुस्लीमबहुल भाग पिंजून काढीत आहेत. गोवंश हत्याबंदीमुळे हजारो मुस्लीम बेकार झाले. त्याची समाजात तीव्र प्रतिक्रिया आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते मिळून एमआयएमच विजयी होईल, असा विश्वास पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी व्यक्त केला.
मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्यास ते काँग्रेस व राणे यांना त्रासदायक ठरू शकते. हे ओळखूनच काँग्रेसने मुस्लीमबहुल भागांमध्ये एमआयएमला मत म्हणजे शिवसेनेला मदत असा प्रचार सुरू केला आहे. सुमारे सव्वा लाख मराठी मतांमध्ये राणे आणि शिवसेना अशी विभागणी होणार आहे. सुमारे २५ हजार दलित मतांवर काँग्रेसचा डोळा आहे. पण या मतांमध्ये विभागणी होणार आहे. ३० हजार उत्तर भारतीयांच्या मतांसाठी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. कृपाशंकर सिंग व अन्य नेते या मतांसाठी गल्लोगल्ली फिरत आहेत. मराठी मते आमच्याच परडय़ात पडतील, असा शिवसेना नेते अनिल परब यांना विश्वास आहे. कोकणातील मतदारांनी राणे यांना नाकारले. आता वांद्रे मतदारसंघातील कोकणी मतदार त्याचीच पुनरावृत्ती करतील, असा शिवसेना नेते दावा करतात.
मुस्लीम मतांचे विभाजन होण्याऐवजी जास्तीत जास्त मते एमआयएमच्या परडय़ात पडतील तेवढे फायदेशीर, असे शिवसेनेचे गणित आहे. मुस्लीम मते एमआयएमने एकगठ्ठा घेतल्यास राणे यांच्यासाठी ते प्रतिकूल ठरेल, असे शिवसेनेचे गणित आहे. मराठी, मुस्लीम, उत्तर भारतीय, ख्रिश्चन अशा सर्वच वर्गामध्ये राणे यांना पाठिंबा मिळत  असल्याचा दावा काँग्रेसचे कृपाशंकर सिंग आणि कृष्णा हेगडे यांनी केला. राणे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची प्रचारसभा होणार आहे.