वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नारायण राणे यांना शह देण्यासाठी अवघी शिवसेना शनिवारी ‘मातोश्री’च्या अंगणात एकवटली. राणे यांना शह देण्यासाठी केवळ मुंबईतीलच नव्हे, तर थेट कोकणपट्टय़ातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक वांद्रे परिसरात दाखल झाले होते. पण मतदारसंघात गटागटाने संचार करणाऱ्या शिवसैनिकांना पोलीस ताब्यात घेण्याची वार्ता  पसरताच शिवसैनिकांना धडकी भरली. मुंबईच्या अन्य भागांतील आणि कोकणातील शिवसैनिकांनी थेट स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या घराचा आश्रय घेतला.
वांद्रे विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत  शिवसेनेने दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना रिंगणात उतरविले. काँग्रेसच्या उमेदवारीवर नारायण राणे आखाडय़ात उतरले. तर सिराज खान यांची उमेदवारी जाहीर करून एमआयएमने या दोघांपुढे नवे आव्हान निर्माण केले. ही पोटनिवडणूक शिवसेना आणि नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत विजयश्री आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिवसेनेने चंग बांधला आहे. वांद्रे परिसरातील शिवसैनिकांच्या दिमतीला अवघ्या मुंबापुरीतील शिवसैनिकांनी धाव घेतली आहे. तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी मुंबईतीलच नव्हे, तर सिंधुदुर्ग आणि आसपासच्या परिसरातील शिवसैनिक वांद्रे मतदारसंघात दाखल झाले होते. शनिवारी भल्या पहाटेच काही शिवसैनिक या परिसरात दाखल झाले. नेमून दिलेल्या परिसरात त्यांची सकाळपासूनच गस्त सुरू झाली. काहींनी शिवसेना शाखांवर तळ ठोकला, तर काही प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवरील मतदारांवर नजर ठेवून होते. मतदान केंद्राच्या बाहेरही शिवसैनिकांची ये-जा सुरू होती. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपखाशाप्रमुख, गटनेते आणि तमाम शिवसैनिकांचे जथ्थे गटागटाने वांद्रे मतदारसंघात फिरत होते. उन्हाचा तडाखा वाढत असतानाही शिवसैनिकांचा संचार सुरूच होता. कुणी चालत, कुणी दुचाकीने, तर कुणी मोठय़ा गाडय़ांमधून फिरत होते. शिवसैनिकांच्या संचारामुळे पोलीसही हैराण झाले होते.
मतदारांच्या मार्गदर्शनासाठी शिवसेना, काँग्रेसने मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर टेबले थाटली होती. या टेबलांभोवती कार्यकर्त्यांचा गराडा  पडला होता. पोलीस त्यांना हटकून गर्दी पांगविण्याचा प्रयत्न करीत होते. काही टेबलवर शिवसेना आणि काँग्रेसने बॅनर्सही झळकविले होते. पोलिसांनी ते काढण्यास भाग पाडले.
सायंकाळी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी एक-दीड तास आधी शिवसैनिक घराघरातून बाहेर पडले आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.