मुंबई पालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना वाद चिघळला

मुंबई : भाजप नेत्यांच्या संकल्पनेनुसार वांद्रे किल्ल्याची डागडुजी आणि सुशोभीकरणाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता. मात्र शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करीत भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मुंबई महापालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

पालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील वांद्रे किल्ला परिसराचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना भाजप नेते आशीष शेलार यांनी माडली होती. त्यानुसार पालिकेने वांद्रे किल्ला परिसराच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला होता. निविदा प्रक्रिया राबवून १५ टक्के कमी दराने काम करण्यास तयार असलेल्या एपीआय सिव्हिलकोन कंपनीला १९ कोटी ११ लाख रुपयांचे कंत्राट देण्याचे प्रशासनाने निश्चित केले होते.

याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मागील बैठकीत सादर केला होता. मात्र सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव त्या वेळी राखून ठेवण्यात आला होता. स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत पुन्हा हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. रोषणाई आणि पायवाटांवर विशिष्ट दगड बसविण्यासाठी अनुक्रमे करण्यात येणाऱ्या ५.५ कोटी रुपये आणि ७ कोटी रुपये खर्चाला काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी आक्षेप घेतला. वांद्रे किल्ला परिसरात २००७ च्या सुमारास ५० झोपडय़ा होत्या. आजघडीला तेथे ३०० झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. वारंवार तक्रार करूनही पालिका अधिकाऱ्यांनी या झोपडय़ांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन कसे आणि कुठे करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच केवळ वांद्रेच का, वरळी आणि माहीम किल्ल्यांचेही सुशोभीकरण करावे, असे सांगत आसिफ झकेरिया यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आसिफ झकेरिया यांच्या मागणीला पाठिंबा देत माहीम, शीव, वरळी किल्ल्यांच्या सुशोभीकरणाची मागणी केली. झोपडपट्टीवासीयांचे आधी पुनर्वसन करा आणि मगच वांद्रे किल्ल्याचे सुशोभीकरण करावे, असे सांगत विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला पाठिंबा दर्शविला.

शिवसेनेची खेळी ओळखून भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर यांनी आसिफ झकेरिया यांच्या उपसूचनेला विरोध केला. किल्ल्यांचा विकास करून पर्यटनाला चालना देता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री वांद्रे येथे असून तेथील किल्ल्याचे सुशोभीकरण करुन पर्यटनाचा श्रीगणेशा करावा, असे सांगत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न प्रभाकर शिंदे यांनी केला. मात्र किल्ल्यांचा विकास पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून करण्यात येतो. या किल्ल्याचा विकास करण्याची सूचना कुणी नेत्याने केली आहे का, अशी कोपरखळी मारत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मुंबईतील उर्वरित किल्ल्यांच्या विकासाचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्यांचा एकत्रित विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले. मतदान घेत प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची उपसूचना बहुमताने मंजूर केली, तर मूळ प्रस्ताव नामंजूर केला.

१९ कोटी ११ लाख रुपयांचा प्रस्ताव

१९ कोटी ११ लाख रुपयांचा प्रस्ताव असून यातून किल्ल्याच्या मोडकळीस आलेल्या भिंतीची दुरुस्ती, प्रवेशद्वार उभारणे, लगतच्या उद्यानाचा विकास, मोकळ्या जागेत शहरी वन निर्माण करणे, रोषणाई करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.