वांद्रेतील गरीबनगर झोपडपट्टीतील आगीप्रकरणी पोलिसांनी शबीर खानला अटक केली आहे. महापालिकेच्या कारवाईतून आपले अनधिकृत दुकान वाचवण्यासाठीच शबीरने आग लावल्याचा आरोप असून त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी तानसा जलवाहिनीलगतच्या अतिक्रमित झोपड्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकावर झोपड्यांमध्ये लागलेल्या आगीमुळे कारवाई थांबवण्याची वेळ आली. गरीबनगर वस्तीत सिलिंडर स्फोटामुळे भडकलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आली होती. गरीबनगरातील आग अपघाताने लागलेली नसून त्यामागे घातपात असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी शबीर खान या दुकानदाराला अटक केली.  तर शबीरच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु असल्याचा पोलिसांनी सांगितले.

शबीर खानचे गरीबनगरात कपड्याचे दुकान असून अनधिकृत दुकानावर कारवाई झाल्यास नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे शबीरने अन्य दुकानदारांच्या मदतीने झोपड्यांना आग लावण्याचा कट रचला. शबीर आणि त्याचे चार भाऊ गरीबनगरमध्ये राहतात. आगीत शबीरच्या घराचेही नुकसान झाल्याचे समजते. शबीर आणि त्याच्या साथीदारांनी कचरा गोळा करुन पेटवला. यानंतर त्यांनी सिलिंडर आगीत टाकले, त्यामुळे आग भडकली, असे सांगितले जाते. शबीरच्या नातेवाईकांचा आझाद मैदान दंगलीतील आरोपींमध्ये समावेश होता, असे वृत्त आहे. मात्र या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरम्यान, आजपासून (सोमवारी) गरीबनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाईला सुरुवात होणार आहे. अतिक्रमणे हटवताना स्थानिकांचा विरोध तसेच आग लागण्याच्या घटना घडल्याने त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजूनच कारवाई हाती घेतली जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.