पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या वांद्रे-वर्सोवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. वांद्रे-वर्सोवा दरम्यानचा ९.८९ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्यासाठी अंदाजे ४३४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. किनाऱ्यापासून ९०० मीटर आत समुद्रावर बांधण्यात येणारा हा सागरी सेतू आठ पदरी असेल. येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी चार मार्गिका त्यावर असतील. या सेतूवर जाण्यासाठी व येण्यासाठी वांद्रे आणि जुहू येथे दोन जोडरस्ते (कनेक्टर) बांधण्याचेही प्रस्तावित आहे. जानेवारी २०१४ मध्ये या सेतूचे बांधकाम सुरू करायचे आणि पाच वर्षांत संपवायचे असे नियोजन आहे.