News Flash

बँकांच्या थकीत हप्त्यांमुळे थेट नोकरीवर गदा?

काही कंपन्या अशा एजंटांच्या तक्रारीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांला नोकरीवरून काढूनही टाकत आहेत.

हप्त्यांसाठी धाक...

|| निशांत सरवणकर

वसुली एजंटांकडून खोट्या तक्रारी; कार्मिक व्यवस्थापकांशीही अरेरावी

मुंबई : करोनामुळे कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांच्या वसुलीसाठी खासगी बँकेने नेमलेल्या एजंटांची मजल संबंधित ग्राहकाच्या नोकरीवर गदा आणण्यापर्यंत गेली आहे. यासाठी हे एजंट खोटेनाटे सांगण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, तसेच कार्मिक व्यवस्थापकांशीही या एजंटांनी अरेरावी सुरू केल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे पुनर्रचित करून देणाऱ्यां खासगी बँकांकडून सामान्य ग्राहकांच्या थकलेल्या तीन-चार हप्त्यांसाठी वसुली एजंट नेमून अरेरावी सुरू केली जात आहे. अशा पद्धतीने नेमल्या गेलेल्या वसुली एजंटांकडून संबंधित ग्राहकाला आतापर्यंत धमकावले जात होते. आता संबंधित ग्राहकाच्या कंपनीशी संपर्क साधून थेट कार्मिक व्यवस्थापकांशीही हे एजंट आक्षेपार्ह भाषेत बोलू लागले आहेत. तसेच खोट्या तक्रारी करीत आहेत. काही कंपन्या अशा एजंटांच्या तक्रारीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांला नोकरीवरून काढूनही टाकत आहेत.

असे धमकीचे फोन आम्हाला आले होते, परंतु आम्ही त्याला फारसे महत्त्व दिले नाही, असे पारकर कम्युनिकेशन्सचे महेश पारकर यांनी सांगितले. मात्र सर्वच कंपन्या असा विचार करीत नसतील. कर्जाच्या हप्त्यांपोटी नोकरी गमावण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येऊ शकते. कर्ज घेणारे ग्राहक हीच तुमची संपत्ती असताना त्यांना देशोधडीला लावले जात असल्याची या खासगी बँकांना कल्पना आहे का, असा सवालही पारकर यांनी विचारला आहे. एका खासगी बँकेच्या प्रवक्त्याने नाव न छापण्याच्या  अटीवर सांगितले की, हप्त्यांची वसुली करण्यासाठी जाहिरात देऊन एजन्सी नेमतो. एकूण वसुलीवर चांगली टक्केवारी देऊ करण्यात आल्यामुळे ही एजन्सी अधिकाधिक वसुलीच्या मागे लागते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा धाक ते दाखवितात. त्याच्याशी बँकेचा संबंध नसतो. पोलिसांत प्रकरण गेले तरी ही एजन्सीच ते हाताळते. या एजन्सीकडून थेट कार्मिक व्यवस्थापकांना धमकावले जात असेल वा ग्राहकाबद्दल खोटेनाटे सांगितले जात असेल तर जोपर्यंत आमच्यापर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही, असेही त्याने सांगितले.

’एखाद्या कर्मचाऱ्यांने घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकविलेले असले तरी बँकेत घोटाळा केल्याची खोटी तक्रार करण्यास काही एजंटांनी सुरुवात केली आहे.

’त्यामुळे संबंधित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. अशा वेळी हे एजंट पुन्हा त्या ग्राहकाला संपर्क करून आम्ही काय करू शकतो हे पाहा, असे धमकावत आहे. तुमची नोकरीही जाईल, अशी भीती घालून हप्ते भरण्यास भाग पाडत आहेत.

कंपन्यांना आयते कोलीत…

करोनामुळे कर्मचारी कपात करण्याच्या विचारात असलेल्या कंपन्यांना अशा वसुली एजंटांच्या फोनमुळे आयतेच कोलीत मिळाले असल्याची चर्चा या प्रकारामुळे सुरू झाली आहे.

 

अशा प्रकरणांमध्ये फारतर अर्वाच्य शिवीगाळ केली म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. वसुली एजंट नेमण्यास कायद्याने मुभा दिली आहे. या एजंटांच्या अरेरावीबाबत तक्रार आली तरी असे धमकीचे वा शिवीगाळ करणाऱ्यां व्यक्ती शोधून काढणे कठीण होते. वसुली एजंटांकडून कॉल सेंटर्सचा वापर अशा कामासाठी केला जातो. कदाचित मानसिक त्रास देऊन हप्ते भरण्यास भाग पाडणे हा हेतू असावा. पण तक्रार आली तर आम्ही कारवाई करतो. – मिलिंद भारांबे, सहआयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 1:18 am

Web Title: bank overdue installment false complaints from recovery agents corporate companies akp 94
Next Stories
1 मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका
2 काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे संकेत
3 मुंबईत ६६६ नवे रुग्ण
Just Now!
X