करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर बँका, खासगी कार्यालये यांनी वेळेची विभागणी करून वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम करावे. घरातून काम करण्याची कार्यपद्धती अवलंबावी. गर्दी आणि विविध यंत्रणांवरील ताण टाळण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले.

मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून सनदी लेखापाल आणि कंपनी सचिवांसोबत संवाद साधला. त्यावेळी हे आदेश दिले.  सनदी लेखापाल तसेच कंपन्यांमध्ये कामाच्या वेळांची विभागणी आणि कार्यप्रणालीत बदलाची एसओपी सादर करावी. जेणेकरून या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांना कामकाज करणे सुलभ होईल. तसेच ही एसओपी इतरांनाही मार्गदर्शक

ठरेल, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडियाचे अध्यक्ष निहार जंबुसरिया, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नागेंद्र राव, पवन चांडक, दुर्गेश काबरा, देवेंद्र देशपांडे, देबाशीष मित्रा, नितीन दोशी आदी उपस्थित होते.

कठोर निर्बंधांचे जोरदार समर्थन

करोनाचे संकटच मोठे आहे. त्यामुळे अत्यंत नाइलाजास्तव कठोर निर्बंधांचा अप्रिय निर्णय घ्यावा लागला आहे. याची पूर्वकल्पना वारंवार देत आलो आहे. करोना वाढू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी करोना रोखण्यासाठी  कठोर उपाय योजना कराव्याच लागतील असे सांगताना  ही टाळेबंदी सरकारने नाही तर करोनाने केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  टाळेबंदीचा परिणाम सगळ्यांवरच म्हणजे विकासकामांवर, लोकांच्या रोजीरोटीवर होतो याची जाणीव आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर संपवायची आहे. पण मध्यंतरी आपण बेफिकीर झालो. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता उभ्या केलेल्या सुविधा अपुऱ्या पडतील, ऑक्सिजनचा तुटवडा होईल, अशी भीती आहे. रुग्णसंख्या वाढ रोखण्याठीच हे असे निर्बंध आणावे लागले आहेत, असे सांगत त्यांनी कठोर निर्बंधांचे जोरदार समर्थन के ले.