News Flash

‘इस्लामिक रिसर्च’च्या संकेतस्थळावर बंदी

नाईकच्या अडचणींत अधिकच वाढ झाली आहे.

वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याच्या मुंबईतील कार्यालयांची तपासणी राष्ट्रीय तपास संस्थेने सलग तिसऱ्या दिवशीही सुरू ठेवत त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या संकेतस्थळावरही बंदी घातली. त्यामुळे नाईकच्या अडचणींत अधिकच वाढ झाली आहे.

चिथावणीखोर भाषणांमुळे दहशतवादी कृत्यांना प्रवृत्त करण्याचा आरोप असलेल्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या झाकीर नाईक याच्याभोवतीचा फास राष्ट्रीय तपास संस्थेने आवळण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवडय़ात केंद्र शासनाने ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देणारी संस्था म्हणून बंदी घातल्यानंतर तपास यंत्रणेच्या कार्याला वेग आला आहे. बांगलादेशातील ढाका येथील दहशतवादी हल्ल्यातील सहभागींना नाईक यांच्या भाषणाने दहशतवादी कृत्ये करण्यास प्रोत्साहन मिळाले, असा ठपका ठेवत बांगलादेश सरकारने नाईक याच्या भाषणांवर त्यांच्या देशात बंदी घातली होती. यानंतर भारतातील दहशतवादविरोधी तपास यंत्रणांनीदेखील सतर्क होत नाईक याच्या भाषणाची तपासणी करण्यास सुरुवात केली होती. यासंबंधी यंदाच्या १ जुलैला नाईक याला राष्ट्रीय तपास संस्थेने समन्सही बजावले होते. मात्र परदेशात असल्याने नाईक याने आरोपांचा इन्कार करत त्याला दाद दिली नव्हती.

गेल्या दोन दिवसांपासून नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ची कार्यालये ताब्यात घेत तेथे तपासकार्य सुरू केले असून त्याच्या हार्मनी मीडिया प्रा. लि. कंपनीतर्फे चालवण्यात येणाऱ्या पीस टीव्ही या वाहिनीच्या कार्यालयातही हे तपासकार्य सोमवारी रात्रीपर्यंत सुरू होते.

तसेच हे तपासकार्य १७ ठिकाणी सुरू असतानाच राष्ट्रीय तपास संस्थेने ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या चिथावणीखोर भाषणांचा समावेश असलेल्या संकेतस्थळावरही सोमवारी बंदी घातली. तपासाचा भाग म्हणून शक्य त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करण्यात येईल, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

  • तपास संस्थेच्या समन्सला नाईक याने उत्तर न दिल्यास त्याच्याविरोधात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
  • सध्या नाईक याच्या फेसबुक, ट्विटर, यूटय़ूबवरील चिथावणीखोर चित्रफितींवर बंदी घालण्यासाठी तपास संस्था प्रयत्नशील असून यासाठी अमेरिकी यंत्रणांची मदत घेण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:52 am

Web Title: banned on islamic research center website
Next Stories
1 बेकायदा इमारतींच्या पाडकामात अडथळे
2 वाळूमाफिया देशासाठी सर्वाधिक घातक
3 प्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका
Just Now!
X