लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही फलकबाजी करीत मुंबई विद्रूप करण्याचे उपद्व्याप सुरूच असून ११ महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेने ठिकठिकाणांहून तब्बल पाच हजारांहून अधिक फलक काढून टाकले आहेत. यामध्ये राजकीय आणि धार्मिक फलकांची संख्या अधिक आहे. राजकीय फलकबाजीवर बंदी असतानाही राजकारण्यांकडून मुंबईचे विद्रूपीकरण सुरू असून राजकीय फलकबाजी रोखण्यात पालिका अपयशी ठरत आहे. त्यामुळे या संदर्भात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय माहिती अधिकार कार्यकर्त्यांने घेतला आहे.

राजकीय कार्यक्रम, जाहीरसभा, आंदोलन, नेत्यांचे वाढदिवस आदींबाबत राजकीय मंडळींकडून मोठय़ा प्रमाणावर फलकबाजी करण्यात येत होती. त्यामुळे मुंबईचे विद्रूपीकरण होत होते. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने राजकीय फलकबाजीवर बंदी घातली आहे. अन्य संस्थांना काही अटीसापेक्ष पालिकेकडून फलक लावण्यास परवानगी देण्यात येत आहे. असे असतानाही मुंबईत मोठय़ा प्रमाणावर फलक झळकविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

गेल्या ११ महिन्यांमध्ये ५०९४ फलक, भित्तिपत्रके, झेंडे पालिकेने हटविले. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कारवाई करून अनुक्रमे ११२५, ९००, ५१५ फलक, भित्तिपत्रके, झेंडे हटविण्यात आले होते. टाळेबंदीच्या काळात फलकबाजीला आळा बसला होता. मात्र टाळेबंदी शिथिल होताच पुन्हा फलकबाजी वाढली आहे.

१०१ जणांवर गुन्हा

बंदी असतानाही बॅनर झळकविल्याप्रकरणी पालिकेने १०१ जणांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच ७४५ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे, तर ३७ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जानुसार पालिकेकडून वरील माहिती उपलब्ध करण्यात आली. फलकबाजी करून मुंबई विद्रूप करणाऱ्यांविरुद्ध पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळेच राजकीय फलकबाजीला आळा बसू शकलेला नाही. परिणामी मुंबईचे विद्रूपीकरण सुरूच आहे. याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचे शरद यादव यांनी सांगितले.

बॅनर, भित्तिपत्रक, झेंडे..

  • पालिकेने ३,५५८ बॅनर हटविले असून त्यात १४७३ राजकीय, ६२७ व्यावसायिक आणि १४५८ धार्मिक बॅनरचा समावेश आहे.
  • राजकीय १०१, व्यावसायिक सात, तर धार्मिक १३१ असे एकूण २४६ फलक हटविण्यात आले आहेत.
  • सुमारे ५७२ भित्तिपत्रकांवर कारवाई करण्यात आली असून त्यात राजकीय ३५, व्यावसायिक ६६, तर धार्मिक ४७१ भित्तिपत्रकांचा समावेश आहे.
  • विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी लावलेले ७१८ झेंडेही जप्त करण्यात आले आहेत.