मुंबई : विधी अभ्यासक्रमाची पदवी घेतली तरी वकिलीची सनद घेणे आता महागले असून बार कौन्सिलकडे सनद मिळण्यासाठीच्या नोंदणी शुल्कात यंदा दुपटीने वाढ झाली आहे.

राज्यातील विधी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयात वकील म्हणून उभे राहण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. येत्या जानेवारीपासून सदस्य नोंदणीसाठीचे शुल्क विधिज्ञ परिषदेने दुप्पट केले आहे. यापूर्वी नोंदणीसाठी ८ हजार रुपये आकारण्यात येत होते आता ते १५ हजार रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदापासून नव्याने नोंदणी करणाऱ्या विधी पदवीधारकांना वाढीव शुल्क भरावे लागणार आहे.

‘सद्यस्थितीत अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. वकिलीच्या व्यवसायात लगेच उत्पन्न मिळू शकत नाही किंवा नोकरीही लगेच मिळत नाही. त्यामुळे १५ हजार रुपये भरणे अनेकांना परवडणारे नाही. नोंदणी केली नाही तर एक वर्ष वाया जाईल,’ असे एका विद्यार्थ्यांने सांगितले. विद्यार्थ्यांनी याबाबत ऑनलाइन याचिकाही नोंदवली आहे. ‘आर्थिक परिस्थितीमुळे वाढीव शुल्क भरणे शक्य नसल्याने काही पदवीधारकांनी सदस्य नोंदणी न करण्याचे ठरवले आहे. परिणामी त्यांचे एक वर्ष वाया जाणार आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता वाढवण्यात आलेले शुल्क यंदा रद्द करण्याची सूचना बार कौन्सिलला द्यावी, असे निवेदन युवासेनेचे प्रदीप सावंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना बुधवारी दिले.