मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग २१ अ मधून झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बार्बा रॉड्रिग्ज या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रोहिणी कदम आणि बसपच्या नयना म्हात्रे यांचा पराभव केला.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत असेन्ता मेन्डोन्सा या दोन प्रभागांमधून विजयी झाल्या होत्या. त्यांनी नंतर २१ अ मधून राजीनामा दिला. त्यामुळे या प्रभागातून पोटनिवडणूक घेण्यात आली. ही पोटनिवडणूक सेना-भाजप यांनी प्रतिष्ठेची बनविली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांनीही प्रतिष्ठा पणाला लावून बार्बा यांचा जोरात प्रचार केला होता.
आज सकाळी नगरभवन येथे मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपच्या रोहिणी कदम यांनी २८० मतांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत बार्बा यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या २७ झाली आहे. प्रभाग १८ मधील महिला जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.