विविध उपाययोजनांनंतरही राज्यात अजूनही अवैध वाळू उपसा सुरू असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी पुण्यात परिणामकारक ठरलेली ‘बारकोड’ पद्धत आता राज्यभर लागू करण्यात येणार आहे. वाळू उपशाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी दिली.
जालना जिल्ह्य़ातील भोकरदन तसेच परभणी जिल्ह्य़ातील पालम येथील नद्यांतून बेसुमार अवैध वाळू उपसा होऊनही महसूल यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा आमदार अस्लम शेख, सुरेश जेथलिया आदी सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रश्नावर सरकारने भूमिका घ्यावी. अन्यथा हा प्रश्न कधीच सुटणार नाही, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली होती. त्यावर बारकोड पद्धतीमुळे कोणत्याही अधिकाऱ्याला कोठेही वाळूची गाडी दिसताच त्या गाडीच्या नंबरवरून ती वाळू अवैध आहे की वैध याचा क्षणभरात उलगडा होणार आहे. त्यामुळे हीच पद्धत सर्वत्र लागू होईल, असे थोरात यांनी सांगितले.