आपल्या समोरून एखादी भरधाव गाडी गेली तरी त्या गाडीच्या बोधचिन्हावरून ती गाडी कोणत्या कंपनीची आहे हे आपण अचूक सांगू शकतो. म्हणजे त्या गाडीचे बोधचिन्ह ही त्या गाडीची पहिली ओळख असते. तसेच मोबाइल किंवा अन्य उपकरणांच्या बाबतीतही आहे. याचा अर्थ कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या यशात त्याच्या बोधचिन्हाला विशेष महत्त्व आहे. एक बोधचिन्ह तयार करताना त्या उत्पादनाबाबतची लोकांची मानसिकता लक्षात घेऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते विकसित केले जाते. अशाच प्रकारे बोधचिन्ह तयार करणाऱ्या बरखा दत्तानी यांनी अल्पावधीतच आपले नाव या क्षेत्रात कोरले आणि आज देशात नऊ ठिकाणी स्वत:चे ‘बरखाज् ब्रॅण्ड क्लिनिक’ सुरू केले. या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत टाटा समूह, आदित्य बिर्ला, ब्रिटानिया, विजय सेल्स आदी बडय़ा ब्रॅण्ड्ससाठी काम केले आहे. याचबरोबर एका व्यक्तीचे स्वाक्षरी बोधचिन्ह तयार करण्याची संकल्पनाही बरखा यांनी या क्षेत्रात रुजवली आणि आमिर खान, आर. माधवनसारख्या अनेक सेलेब्रिटींनी असे बोधचिन्ह तयार करून घेतले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या कामाची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली असून पंतप्रधानांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या विकासकामांचे बोधचिन्ह बरखा यांनी विकसित केले आहे.

कुटुंबाचा बांधकामाचा व्यवसाय असताना बरखा यांनी आपली वेगळी वाट धरली आणि त्या वाटेवर त्या यशस्वीही होत आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विविध ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनांदरम्यान आपल्या चुलतभावासोबत त्या काम करायला जात असे. तेथे त्या त्यांच्या कल्पनांनी स्टॉल अधिक चांगल्या प्रकारे सजवत. यामुळे त्यांच्या स्टॉलकडे लोकांचे लक्ष पटकन वेधले जाऊ लागले. अनेकदा लोकांनी तेथे सादर केलेल्या कलेचे कौतुक केले. यातून प्रोत्साहन मिळत गेले व काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागले. मग बरखा यांनी बँ्रण्डिंगकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मग त्यांनी स्वत:च्या कलांचे सादरीकरण करणारे प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली. यातूनच बरखा यांना लंडन येथील एका बडय़ा ब्रॅण्डचे एका वेळी सात बोधचिन्ह तयार करण्याचे काम मिळाले आणि बरखा यांचे या क्षेत्रातील काम सुरू झाले. चर्चगेट येथील एचआर महाविद्यालयातून बी.कॉम. केल्यानंतर बरखा यांनी लंडन येथील विगन अ‍ॅण्ड लेइन महाविद्यालयातून विपणन क्षेत्रात एम.बी.ए. केले. पण आपल्यातील सुप्त कलाकाराला त्यांनी सतत बहरत ठेवले आणि त्यांनी कला क्षेत्रात आता स्वत:चा एक ब्रॅण्ड बनविला आहे. आजपर्यंत त्यांना विविध नऊ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

असे चालते काम

हे काम क्रिएटिव्ह असल्यामुळे येथे अमुक एका पद्धतीनेच काम होते असे सांगता येणार नाही. पण आपण ज्या ब्रॅण्डसाठी काम करतो आहोत त्या ब्रॅण्डचे लोकांच्या मनातील स्थान, लोकांना होणाऱ्या त्या उत्पादनाचा उपयोग, त्यांची आकर्षित होण्याची मानसिकता अशा एक ना अनेक गोष्टींचा विचार करून ते चित्रांमध्ये उतरावे लागते. जेव्हा आम्ही त्या उत्पादनात पूर्णपणे समरसून जातो तेव्हाच ते आमच्या चित्रातून परिपूर्ण उतरते. जर आमच्याकडून शंभर टक्के दिले गेले तरच आम्हाला त्याचा आनंद मिळतो. ग्राहकाला आम्ही तयार केलेले बोधचिन्ह अधिकाधिक भावले की आमच्या कामाला पावती मिळाली असे आम्ही समजतो, असे बरखा सांगतात. या व्यवसायात तुमची कुणाशी स्पर्धा आहे, असा प्रश्न विचारल्यावर त्या सांगतात की ते मला माहिती नाही, मात्र माझे काम मी चोख करते आणि माझ्याकडे आलेल्या कंपनीला किंवा व्यक्तीला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते.

गुंतवणूक आणि व्यवसायवृद्धी

मी कलाकार आहे यामुळे माझ्या व्यवसायासाठी फार मोठी गुंतवणूक लागत नाही. या क्षेत्रात तुमची कल्पकता हीच तुमची गुंतवणूक असते. माझी कल्पकता गुंतवून मी काम सुरू केले आणि माझ्याकडे असलेल्या ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. यामुळेच अल्पावधीत माझे देशभरात नऊ प्रमुख शहरांमध्ये कार्यालये सुरू झाली आहेत असे बरखा सांगतात. बरखा या केवळ व्यवसाय वाढावा म्हणून काम करत नाही. बोधचिन्हाकडे आकर्षित होऊन ती वस्तू खरेदी करण्याची ग्राहकांची मानसिकता असते. यामुळे दारू, गुटखा, सिगारेट यांसारख्या उत्पादनांचे बोधचिन्ह न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. अशा कंपन्यांनी आम्हाला अनेकवेळा विचारणा केली. मात्र त्यांना नकार दिल्याचे बरखा सांगतात. याचबरोबर ज्या सामाजिक संस्था निरपेक्षपणे काम करत असतात त्यांच्यासाठी मोफत बोधचिन्ह बनवून देत असल्याचेही बरखा यांनी नमूद केले.

भविष्यातील वाटचाल

बरखा यांनी ब्रॅण्डिंग क्षेत्रात नवा आयाम सुरू करून तरुण वयातच मोठी उडी घेतली आहे. यामुळे भविष्यात आणखी काम करण्याची त्यांना संधी आहे. देशभरात नऊ ठिकाणी त्यांची कार्यालये असून हा व्यवसाय अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांनी भविष्यात देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कार्यालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. याशिवाय व्यवसायाच्या कक्षा रुंदावत दुबई, ब्रिटन, अमेरिका यांसारख्या देशांतही स्थानिक सहकार्याने कार्यालये सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

नवउद्यमींना सल्ला

जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर देण्याची वृत्ती जोपासा. आपल्या कर्मचाऱ्यांना तसेच ग्राहकांना आनंदी आणि समाधानी ठेवा. आपण ग्राहकांना दहा गोष्टी देण्याचे मान्य केले असेल तर त्यांना अकरा गोष्टी द्या तरच तुमच्याकडे जास्त ग्राहक येतील, असा अमौलिक सल्ला बरखा यांनी दिला आहे. याचबरोबर आपल्यासाठी जे लोक काम करतात त्यांनाही मागणयापूर्वीच सगळे द्या, असेही बरखा यांनी नमूद केले.

@nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com