22 September 2019

News Flash

मुंबईतून काश्मीरमध्ये जाणाऱ्या गणेशमूर्तीसमोर विघ्न

२०१० पासून पूंछमधील एका प्राचीन शिव-दुर्गा मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे

(संग्रहित छायाचित्र)

समीर कर्णुक

गेली नऊ वर्षे भारत-पाकिस्तान सीमेजवळील पूंछ गावात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावर ३७०चे विघ्न उभे राहिले आहे.

या भागात शांतता नांदावी, जवानांना गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी जम्मू-काश्मीरमधील पूंछ गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी कुल्र्यातील एका कलाकेंद्रातून गणेशमूर्ती काश्मीरला पाठवली जाते. मात्र या वर्षी कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाची परिस्थिती आहे. परिणामी मुंबईतून गणेशमूर्ती नेण्यात अडचणी येत आहेत.

२०१० पासून पूंछमधील एका प्राचीन शिव-दुर्गा मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाची संपूर्ण तयारी याच गावात राहणाऱ्या ईशर दीदी नामक महिला करतात. भारत-पाक सीमेपासून अवघ्या दहा मिनिटांवर हे गाव वसले आहे. त्यामुळे नेहमीच या ठिकाणी तणावाची परिस्थिती असते. या भागात शांतता नांदावी या उद्देशाने ईशर दीदी यांनी गणेशोत्सव सुरू केला. याशिवाय या भागात मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रातील जवानही तैनात असतात. अनेकदा गणेशोत्सवासाठी त्यांना आपल्या घरी जाता येत नाही. हे जवानही गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात.

कुल्र्यातील विक्रांत पांढरे यांच्या सिद्धिविनायक कलामंदिर येथून गणपतीची सहा फुटांची मूर्ती दरवर्षी ट्रेनने जम्मू-काश्मीरला नेली जाते. त्यानंतर दहा दिवस तिथे गणपतीची भक्तिभावाने पूजा केली जाते. गावकऱ्यांसह सीमेवर तैनात असलेले जवान मोठय़ा प्रमाणात पूजेमध्ये सहभागी होतात. त्यानंतर अकराव्या दिवशी नदीमध्ये बाप्पाचे वाजतगाजत विसर्जन करण्यात येते. मात्र यावर्षी कलम ३७० हटवल्याने काश्मीरमध्ये दूरध्वनी आणि मोबाइल सेवा ठप्प आहे. परिणामी गणरायाला घेऊन जाण्यास मोठय़ा अडचणी येत आहेत.

First Published on August 22, 2019 1:13 am

Web Title: barrier in front of ganesh idol going from mumbai to kashmir abn 97