News Flash

बिनदिक्कत प्रवासासाठी बनावट ‘निगेटिव्ह’ अहवालांचा आधार

ठाणे, वसई, मुंबईत टोळ्या कार्यरत; वसईत ३२ जणांवर गुन्हे दाखल

(संग्रहित छायाचित्र)

आंतरराज्य प्रवासासाठी बंधनकारक करण्यात आलेल्या करोना चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ करून देणारी टोळी मुंबई-महामुंबई क्षेत्रात कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील चारकोप येथे बनावट अहवाल तयार करून देणाऱ्या एकास अटक करण्यात आली असतानाच वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या बसमधून खोट्या अहवालानिशी प्रवास करणाऱ्या ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे निर्बंध लागू करण्यात आले असून येत्या काही दिवसांत कडक टाळेबंदी लागू होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक स्थलांतरित मजूर, परप्रांतीय कामगार तसेच सामान्य कुटुंबे परराज्यातील आपापल्या गावाकडे कूच करू लागली आहेत. यापैकी बहुतांश राज्यांत महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी करोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचाच गैरफायदा घेत बनावट अहवाल देऊन प्रवाशांकडून पैसे उकळणारी टोळी सक्रिय झाली आहे. अशाच एका टोळीला गुन्हे शाखा १च्या पथकाने अटक केली आहे. ही टोळी मुंबईवरून मजूर आणि कामगारांना गुजरातला बेकायदेशीररीत्या बसमधून नेत होती. गुन्हे शाखेने पवन ट्रॅव्हल्सच्या बसवर कारवाई केली. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. त्यापैकी चालक, वाहकासह २१ जणांकडे बनावट करोना चाचणीचे प्रमाणपत्र होते, तर उर्वरित १२ प्रवाशांकडून चाचणीच्या नावाखाली अतिरिक्त ३०० रुपये आकारण्यात आले होते. या प्रवाशांना नियमांचे उल्लंघन करून दाटीवाटीने बसमध्ये बसविण्यात आले होते. या टोळीने ही प्रमाणपत्रे कोठून बनवली, यात कोणत्या डॉक्टर आणि प्रयोगशाळेचा सहभाग आहे का? त्याचा आम्ही तपास करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांनी सांगितले.

आधीचा अनुभव

गेल्या वर्षी टाळेबंदीत परराज्यात जाण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक होती. परप्रांतातून आलेले श्रमिक, विद्यार्थ्यांनाच प्रवासाची मुभा होती. मात्र त्यासाठी पोलिसांनी ऑनलाइन उपलब्ध करून दिलेला अर्ज भरून द्यावा लागत होता. अर्जातील तपशिलांची पडताळणी करूनच पोलीस प्रवासास परवानगी देत होते. तेव्हा ट्रॅव्हल एजंट, वाहनचालकांसह अन्य व्यक्तींना पोलिसांचे बनावट परवानगी पत्र तयार करून देणाऱ्यांचा सुळसुळाट झाला होता.  एका कारवाईत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कं त्राटी कामगारालाही अटक झाली होती.

अहवाल ‘निगेटिव्ह’ करण्याची पद्धत

विविध प्रयोगशाळांचे चाचणी अहवाल ‘स्कॅ न’ करून, अ‍ॅपद्वारे नावे, तपशील बदलून बनावट चाचणी अहवाल दिले जाऊ शकतात. चारकोप पोलिसांनी गेल्या आठवड्यात नामांकित प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद सलीम मोहम्मद उमर (२९) याला अटक केली. त्याने ३७ जणांचे नमुने गोळा केले. मात्र ते प्रयोगशाळेत न नेता फेकून दिले. तसेच प्रयोगशाळेतील जुन्या अहवालावर संगणकीय छेडछाड करून त्यात नमुने घेतलेल्यांची नावे व तपशील चिकटवले. मात्र एका महिलेच्या अहवालातील क्यूआर कोडमुळे उमरची चोरी पकडली गेली. उमरने परराज्यांत जाण्यास इच्छुक परप्रांतीय श्रमिक आणि इतरांना पैशांच्या मोबदल्यात असे बनावट अहवाल उपलब्ध करून दिल्याचा संशय पोलिसांना आहे.

भीतीमुळे चाचणीस टाळाटाळ

संभाव्य टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर परराज्यांत जाणाऱ्यांपैकी अनेकांना चाचणी अहवाल (निगेटिव्ह) असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, याबाबत माहीत नसते. अनेक जण चाचणी करून घेण्यास घाबरतात. चाचणी के ल्यास करोनाची बाधा होईल व गावी जाता येणार नाही, उपचार मिळतील का, कु टुंब धसका घेईल, आदी विचारांमुळे अनेक जण चाचणी करून घेणे टाळतात. अशा व्यक्तींकडून जादा पैसे घेऊन खोटे अहवाल देणारे त्यामुळे सक्रिय झाल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:54 am

Web Title: based on fake negative reports for safe travel abn 97
Next Stories
1 दुकानांच्या अर्धबंद दारांतून खरेदीची लगबग
2 हिटलरच्या आत्मचरित्रातून ‘एलएसडी’ची तस्करी
3 गावी जाण्यासाठी दोन दिवसांपासून स्थानकात मुक्काम
Just Now!
X