X
X

पायाभूत चाचणीचा पहिला दिवस गोंधळाचा

एक दिवसात मूल्यांकन पूर्ण करण्याचा आदेश नसल्याचे स्पष्टीकरण

एक दिवसात मूल्यांकन पूर्ण करण्याचा आदेश नसल्याचे स्पष्टीकरण

विद्यार्थ्यांची मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमाच्या आकलनाची पडताळणी करण्यासाठी घेतलेल्या पायाभूत चाचणीच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील शाळा व शिक्षकांची मोठी धांदल उडाली. परीक्षा झाल्यावर लगेचच म्हणजेच त्याच दिवशी सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण करण्याचे आदेश मिळाल्याने मुंबईतील बहुतांश शाळांमध्ये एका विषयाचे मूल्यांकन दुसऱ्या विषयाच्या शिक्षकांनी करणे यासारखे गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. नियोजनातील अभावामुळे दरवर्षी चर्चेत असणारी ही पायाभूत चाचणी यशस्वी करण्यामध्ये यंदाही सरकारला अपयश आले आहे. मूल्यांकनातील घोळामुळे ही चाचणी फोल असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची ७ ते १२ सप्टेंबर या काळात राज्यभरात पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून सुरु झालेल्या या चाचणीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन त्याच दिवशी पूर्ण करण्याचे आदेश संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.  एकाच दिवशी सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे शक्य होणार नसल्याचे शिक्षकांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिले. परंतु मुख्याध्यापकांनी सरकारचा आदेश असल्याचे सांगून हात वर केले त्यामुळे ऐनवेळी शिक्षकांची मोठी पंचाईत झाली. काही शाळांनी यावर तोडगा काढत भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका इतर विषयाच्या शिक्षकांनी तपासल्या असल्याचे समोर आले आहे.

‘आमच्या शाळेतील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ६० ते ७० आहे. दोन किंवा तीन वर्गाना एक विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना एकाच दिवशी सुमारे २०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे शक्यच नाही. मूल्यांकन पूर्ण झाल्याशिवाय शिक्षकांनी घरी जायचे नाही, असे शाळा मुख्याध्यापकांनी सांगितले. तेव्हा नाईलाजाने आज झालेल्या भाषा विषयाच्या उत्तरपत्रिका सर्वच विषयाच्या शिक्षकांनी तपासल्या. नमुना उत्तरपत्रिका असली तरी निबंध किंवा पत्रलेखन यासारख्या प्रश्नांचे मूल्यांकन करणे माझ्यासारख्या गणित शिकविणाऱ्या शिक्षकाला कसे साधणार, असा प्रश्न एका शिक्षकाने लोकसत्ताशी बोलताना उपस्थित केला आहे. घाईगडबडीने उरकलेल्या या मूल्यांकनामुळे खरतरं ही पायाभूत चाचणी फोल ठरली आहे, असेही पुढे ते म्हणाले.

शिक्षक संघटनांनी यासंदर्भात महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकाराबाबत विचारणा केली असता, असा कोणताही आदेश न दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र हा संदेश सर्व शाळांना मिळू न शकल्याने मूल्यांकन करायचे की नाही, असा गोंधळ अनेक शाळांमध्ये दुपारनंतर बराच काळ सुरु होता. तेव्हा या गोंधळामध्येच मुंबईतील बहुतांश शाळांनी गुरुवारी झालेल्या भाषा विषयाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन उरकले आहे.

काही खाजगी शाळांना वेळेवर प्रश्नपत्रिका न मिळाल्याने त्यांनी इतर शाळांकडून प्रश्नपत्रिका घेऊन छायांकित प्रती काढल्या आहेत. प्रश्नपत्रिका गोपनीय राहतील असा आदेश सरकारने दिलेला असताना नियोजनातील ढिसाळ कारभारामुळे प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच सर्वाना उपलब्ध झाल्या आहेत.

या संदर्भात अनेक तक्रारी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडे करण्यात आल्याने प्राधिकरणाने गुरुवारी रात्री उशिरा परिपत्रकाच्या माध्यमातून याबाबत खुलासा केला आहे. पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांना ऑनलाइन व ऑफलाइन भरण्याची मुभा असणार आहे. तेव्हा शाळांकडून किंवा शिक्षकांकडून मूल्यमापनाचा कोणताही लेखी अहवाल घेण्यात येऊ नये. तसेच एका दिवसात सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याबाबत सक्ती करू नये, असे महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.

 

24
First Published on: September 8, 2017 12:22 am