उद्धव ठाकरे, शरद पवारांची एकमुखी साद

मुंबई : बीडीडी चाळींच्या पुनर्विकासानंतर मिळणारे घर विकू  नका. इथे मराठी पाळेमुळे कायम राहतील, त्यांना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या. या भागात मराठी टक्का टिकला पाहिजे. मराठीचा आवाज दिसला पाहिजे, अशा सूचक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील मराठी माणसाला रविवारी साद घातली. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईवरील मराठी माणसाच्या हक्काबाबत नेहमीच बोलणाऱ्या ठाकरे यांच्या सुरात पवारांनी सूर मिसळल्याचे चित्र दिसले.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकामाचा आरंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज वरळी येथील जांबोरी मैदानावरील कार्यक्रमाद्वारे झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते या वेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या निर्णयाबाबत संभ्रम असला तरी मुंबई पालिके च्या निवडणुका आघाडी करून लढवण्याचा मानस शिवसेना व राष्ट्रवादीने वारंवार व्यक्त के ला आहे. अशा परिस्थितीत बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कांची भाषा बोलणाऱ्या, मराठी माणसाला भावनिक-राजकीय साद घालणाऱ्या शिवसेनेला रविवारी राष्ट्रवादीचीही साथ मिळाल्याचे दिसले.

बीडीडी चाळीच्या जागेवर मालकी हक्काची मोठी घरे रहिवाशांना मिळतील. चाळी जाऊन इमारती झाल्या तरी या इमारतींमधून दशकानुदशके  राहणारा कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका. ही मालमत्ता तुमच्या कष्टाचा ठेवा आहे. तुम्ही ती विकू नका. अधिक सवलतींच्या जागा पुढच्या पिढय़ांसाठी राखून ठेवा. या भागातला मराठी टक्का घालवू नका. मराठी आवाज दिसला पाहिजे, टिकला पाहिजे. ती खबरदारी घ्या, असे आवाहन शरद पवार यांनी के ले. तसेच बीडीडी चाळींमधील संस्कृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णा भाऊ साठे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, कॉ. शाहीर अमरशेख, मास्टर भगवान, सुनील गावस्कर, पु. ल. देशपांडे या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या थोरांची नावे घेत या गिरणगावाच्या परिसरामध्ये त्यांचे वास्तव्य होते, इतिहास निर्माण करणारे लोक या भागात निर्माण झाले, असा गौरवपूर्ण उल्लेखही शरद पवार यांनी के ला.

बीडीडी चाळींच्या इतिहासाचा दाखला देत मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेची  आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणात करून दिली. मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी मराठी माणसाने रस्त्यावर सांडलेले रक्त या चाळीने पाहिले. आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही. अख्खे आयुष्य आपण या ठिकाणी राहिलात. हे घर तुमचे स्वत:चे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि या भागात मराठी पाळेमुळे कायम ठेवा, त्यांना धक्का लावू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ले.

पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

अलीकडे महाराष्ट्रावर सतत नवनवी संकटे येत आहेत. अतिवृष्टीचे संकट मोठे आहे; पण या सर्व संकटांवर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. एकीकडे पूरग्रस्तांची घरे बांधण्याचे आव्हान तर दुसऱ्या बाजूस शंभर वर्षे मुंबईत कष्ट करून देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.