बीडीडी वसतिगृहाचा कायापालट करणार

मुंबई : वरळी बीडीडी चाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी या वसतिगृहाला भेट देऊन तेथील दुरवस्थेची पाहणी केली. मात्र त्याच वेळी त्यांनी आपण स्वत: या वसतिगृहाची जबाबदारी घेतली आहे, येत्या काही दिवसांत आपण त्याचा कायापालट करू, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.

या वसतिगृहातील मुला-मुलींना गेल्या अनेक वर्षांपासून गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. इमारतीची पडझड झालेली आहे. खोल्यांचा रंग उडालेला आहे. खाट, गाद्याही धड नाहीत. स्वयंपाकघरात अस्वच्छता. वसतिगृहाच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्याची दखल घेत मुंडे यांनी वरळी येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंडे यांनी या वेळी वसतिगृहामध्ये जाऊन तेथील दुरवस्थेची पाहणी केली. मात्र ही अवस्था बदलण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.  वरळी येथील वसतिगृहाची आपण स्वत: जबाबदारी घेऊन त्यात आवश्यक त्या तातडीने सुधारणा करण्यात येतील. त्याचबरोबर राज्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य ते धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.