मुंबईत बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरु झाली असली तरी बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे काही प्रश्न आहेत. यासंदर्भात बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी रहिवाशांनी त्यांचे प्रश्न राज ठाकरेंसमोर मांडले.

राज ठाकरेंनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना म्हाडाने करार केल्याशिवाय घर न सोडण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईत नायगाव, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि शिवडी येथे बीडीडी चाळी आहेत. मागच्याच आठवडयात वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास टाटा कंपनीकडून करण्याचा मार्ग उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाला. कंपनीच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास कोण करणार, यासाठी टाटा प्रोजेक्ट्स, कॅपॅसिट इन्फ्रास्ट्रक्चर सिटिक (चिनी कंपनी) आणि अरेबियन कन्स्ट्रक्शन, एसीसी इंडिया या कंपन्यांचे कन्सोर्टिअम स्पर्धेत होते. मात्र टाटा कंपनीची निविदा सरस ठरून वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे अधिकृत कंत्राटदार म्हणून कंपनीची निवड झाली. ११ हजार कोटी रुपयांच्या पुनर्विकासाचे कंत्राट टाटा कंपनीच्या झोळीत पडल्याने एसीसी इंडिया या कंपनीने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई विकास विभागामार्फत १९२१ ते २५ या काळात औद्योगिक कामगारांसाठी वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि शिवडी येथे एकूण २०७ चाळी बांधण्यात आल्या. या तीन ठिकाणच्या चाळी सुमारे ८७ एकर (वरळी – ५९.६९; ना. म. जोशी – १३.९ आणि नायगाव – १३.३९) भूखंडावर पसरल्या आहेत. यासाठी म्हाडाची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.