विरोधात बसल्यावर आक्रमक होऊन जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा, असा आदेश काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिला असला तरी राज्यात अद्यापही आक्रमक विरोधकाची भूमिका बजाविण्याची पक्षाची मानसिकताच झालेली नाही.
विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले असले तरी गेल्या दोन महिन्यांत सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका पक्षाने घेतल्याचे चित्र दिसलेले नाही. यामुळेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. काँग्रेस पक्ष आक्रमक विरोधकाची भूमिका बजाविण्यात कमी पडल्याची टीका राणे यांनी केली होती. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सध्या पक्षाचा किल्ला लढवित असले तरी अन्य नेते मात्र अद्यापही त्या मानसिकतेत गेलेले नाहीत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारवर हल्ला चढविला, पण पक्ष संघटनेत ते फारसे सक्रिय नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राधाकृष्ण विखे-पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांकडून राज्याच्या अधोगतीबद्दल यापूर्वीच्या आघाडी सरकारला दोष दिला जातो. त्याला उत्तर देताना विखे-पाटील यांची आक्रमक दिसत नाहीत.
पक्षाच्या नेत्यांना पाठविलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी पक्ष वाढीसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस पक्ष हा जनतेचा आवाज म्हणून सक्रिय झाला पाहिजे, असे मत मांडले आहे.