गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस राहिल्याने पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, फळे-फुले, मखर, तोरण अशा नाना वस्तूंच्या खरेदीकरिता मरगळलेल्या बाजारपेठांमध्ये गुरुवारी नवे चैतन्य दिसून आले.

शिथिलीकरणानंतरही दादर या मध्यवर्ती बाजारपेठेतील वातावरण ग्राहकांविना उजाडच होते. दररोज दुकाने सुरू ठेवूनही ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्पच होता. परंतु गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठा पुन्हा फुलल्या आहेत. वाहतुकीच्या सोयी अद्याप सुरळीत नसल्याने दरवर्षीच्या तुलनेने गर्दी अगदीच तुरळक आहे. परंतु दादर आणि आसपासच्या परिसरातील मंडळींनी खरेदीसाठी उत्साह दाखवला आहे. याच बाजारपेठेत मखर विक्री करणाऱ्या वेदांत आर्टचे विजय सोनावणे सांगतात, ‘पंधरा दिवसांपूर्वी एकतरी मखर विकले जाईल की नाही शंका होती. परंतु गेले दोन दिवस ग्राहकांची लगबग वाढली आहे. दोन दिवसांत २५ ते ३० मखरांची विक्री झाली.’

दादरमध्ये खरेदी के ल्याशिवाय समाधानच होत नाही, या भावनेपोटी आपले वाहन घेऊन मुंबईबाहेरूनही ग्राहक दादरमध्ये येत आहेत. गणेशोत्सवात पूजा विधी अनिवार्य असल्याने पूजेच्या साहित्याला चांगली मागणी आहे. ‘यंदा कापराचे भाव वाढले आहेत. परंतु, कापूरसह धूप, अगरबत्ती, लोबान हे चार घटक आवर्जून घेतले जात आहेत. सत्यनारायण पूजेच्या समग्र साहित्यालाही विशेष मागणी आहे,’ असे पूजा साहित्य विक्रेत्यांनी सांगितले.

कंठी, बनावट फुलांच्या माळा, गणपतींचे दागिने घेऊन बसलेले दशरथ कुंभार सांगतात, ‘ग्राहकांकडून प्रतिसाद आहे. परंतु प्रवासखर्च वाढल्याने आम्हालाच वस्तू वाढीव भावात मिळाल्या आहेत. आता नफा किती काढायचा असा प्रश्न आहे.’ हीच अवस्था दुर्वा, केवडा, ओल्या सुपाऱ्या आणि फळविक्रेत्यांची आहे. ‘फळांच्या किमती प्रचंड वाढल्या. पूर्वी उत्सवात फळे महाग होत असली तरी विक्री होत असे. यंदा फळांचा तुटवडा आहे. शिवाय जी फळे येतात, ती भाव वाढवून विकली जातात. त्यामुळे देवाला लागणारी पाच फळे घेऊन बसायचे. त्यातून १० टक्के  नफा झाला तरी आनंद,’ अशी प्रतिक्रिया गेली अनेक वर्षे दादर स्थानकासमोर फळविक्री करणाऱ्या विजय श्रीधर यांनी दिली.

दरवर्षीच्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्के  खरेदी होत असल्याने अनेक विक्रेते नाराजही आहेत. छबिलदास शाळेलगत उभे असलेले दिल्लीचे यशपाल सिंग खास गणेशोत्सवात मोरपीस विकण्यासाठी मुंबईत येतात. परंतु यंदा मनासारखी विक्री होत नसल्याने ही फेरी वाया जाईल की काय अशी भीती त्यांना वाटते. साध्या बनावटीची ढोलकी विकणाऱ्या १५ ते २० जणांचा गट दहिसरवरून खास या हंगामात दादरला येतो. ‘दिवसाच्या प्रवासाचे पैसे निघतील इतकीही विक्री होत नाही. ढोलकी निर्मिती खर्चही निघणार नाही अशा भावात लोक ढोलक मागतात. त्यामुळे खास गणेशोत्सवासाठी बनवलेले ढोलक पडून राहतील,’ अशी शक्यता त्यांच्यातील अब्दुल्ला कादीम याने बोलून दाखवली.

वडापाव-पाणीपुरीवर ताव

दादरमध्ये आल्यानंतर इथल्या नामांकित वडापाव, लस्सी, पीयूषवर ताव मारल्याशिवाय खरेदीचा आनंद पूर्ण होत नाही. करोनाकाळातही छबिलदासच्या गल्लीत अशा खाद्यप्रेमींची गर्दी कायम होती. एवढेच नाही तर इथल्या प्रसिद्ध पाणीपुरी विक्रेत्याकडेही खरेदीदारांनी गर्दी केली होती. ‘ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर ठेवले आहे. शिवाय मुखपट्टी, हातमोजे वापरूनच आम्ही खाद्यपदार्थ तयार करतो. लोक विश्वासाने येतात. त्यामुळे त्यांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे पाणीपुरी विक्रेत्या सरोज त्रिपाठी यांनी सांगितले.

पाऊस, वेळेच्या मर्यादेचा अडथळा

पावसामुळे खरेदीत व्यत्यय येत आहे. ‘गेले काही दिवस वरचेवर पावसाच्या सरी येत असल्याने ग्राहक फारसा फिरकलेला नाही. त्यात संध्याकाळी ७ ला बाजार बंद होत असल्याने उशिरापर्यंत व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ काही तासच व्यवसाय होतो,’ अशा शब्दात दूर्वा विक्रेत्या मालन शेलार यांनी व्यथा मांडली.