News Flash

रुग्णालयात पाणी शिरू नये याची काळजी घ्या

महापालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पालिका मुख्यालयात पावसाळापूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

संग्रहीत

पावसाळापूर्व आढावा बैठकीत पालिका आयुक्तांच्या सूचना

मुंबई :  गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय व जे. जे. रुग्णालय या दोन महत्त्वाच्या व मोठ्या रुग्णालयांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे यावेळी दोन्ही रुग्णालयांच्या स्तरावर पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत असल्याची व्यवस्था सक्षम असल्याची खातरजमा वेळोवेळी करवून घेण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. करोना भव्य उपचार केंद्रांमध्येही पावसाचे पाणी जाणार नाही याकरीता  रुग्णालयांच्या स्तरावर कार्यवाही करा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पालिका मुख्यालयात पावसाळापूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी, ‘बेस्ट‘ उपक्रमाचे महाव्यवस्थापक  लोकेश चंद्रा यांच्यासह संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई पोलीस, मध्य व पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो इत्यादी संस्थांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला महापालिका क्षेत्रातील नालेसफाई व पर्जन्य जल वाहिन्यांच्या पावसाळापूर्व कामांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना देण्यात आली. नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ हा तातडीने हटविण्याचे व निर्धारित ठिकाणी हलविण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच ज्या परिसरांमध्ये पाण्याचा निचरा कमी वेगाने होतो  अशा सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून डिझेलचा पुरेसा साठा असल्याची खातरजमा वेळोवेळी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याबाबत सर्व विभागांमध्ये रंगीत तालिम  देखील करण्यात आली आहे.

जेथे पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये पावसाळी जाळ्यांची तपासणी विभाग स्तरावर वेळोवेळी करण्यात यावी. त्याचबरोबर पावसाळी जाळ्यांबाबत साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी  कामे  वेळेत करवून घ्यावीत, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्राची दररोज पाहणी करावी.  नालेसफाई, मॅनहोल, वृक्ष व वृक्ष छाटणी इत्यादींची कामे व्यवस्थित व वेळेत होत आहेत याची नियमितपणे पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विद्युत वितरण कंपन्यांनी काही खोदकाम केले असल्यास पूर्ववत करवून घ्यावे. मुंबई मेट्रोची कामे ज्या ठिकाणी सुरु आहेत, त्या ठिकाणी योग्यप्रकारे बॅरिकेड्स लावून घेण्याची कार्यवाही योग्यप्रकारे झाली असल्याची खातरजमा करावी, असे आयुक्तांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:15 am

Web Title: be careful water seep hospital akp 94
Next Stories
1 गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता बोगद्यासाठी पालिकेची जाचक अट 
2 परवानगी मिळूनही सांस्कृतिक संस्था बंदच
3 पोलीस नाईक रेहाना शेख यांचे सर्वत्र कौतुक
Just Now!
X