गेल्या वर्षी पावसाळ्यातील खड्डय़ांचा अनुभव विस्मरणात गेला असेल तर या वर्षी पुन्हा थरारक प्रवासासाठी तयार राहा. वीज, गॅस, इंटरनेट आदी कामांसाठी शहरातील खोदलेले तब्बल एक हजार रस्ते बुजवण्यात आलेले नाहीत. पालिकेने संबंधित खासगी तसेच सरकारी संस्थांची बैठक घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता मुंबईचे रस्ते पूर्ववत करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.
मान्सूनपूर्व उपायांची आखणी तसेच पाहणी करण्यासाठी पालिकेच्या मुख्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. रस्त्यांवरील खड्डे, नालेसफाई, धोकादायक इमारती अशा प्रमुख विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. विविध सेवांसाठी शहरात बारा महिने रस्ते खोदले जातात. मात्र खड्डे वेळीच बुजवून ते नीट केले जात नाहीत. त्याचा फटका मुंबईकरांना पावसाळ्यात बसतो. गेल्या वर्षी खड्डेमय रस्त्यांमुळे मुंबईकरांचे जीणे अवघड झाले होते. या पूर्वानुभवामुळे तसेच हे निवडणुकीचे वर्ष असल्याने रस्त्यांबाबत पालिका अधिक संवेदनशील झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्यासाठी ३१ मे ही मुदत देण्यात आली आहे. मात्र आधीचा अनुभव लक्षात घेता एप्रिलमध्ये पुन्हा एकदा बैठक घेऊन सर्व कामांचा आढावा घेण्यात येईल. नियोजित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा बडगा उचलला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले.  
वीज, गॅस, इंटरनेट, मोबाइल, पाणी, गटारे, नाले आदी विविध सेवांसाठी खाजगी कंपन्या तसेच म्हाडा, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, बीपीटी यांनी रस्ते खोदले आहेत. पालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना असे सुमारे एक हजार रस्ते सापडले आहेत. या रस्त्यांवरील खड्डे बुजवून ते नीट करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. खासगी संस्थांना दंड आकारण्याचा लगाम पालिकेच्या हाती असला तरी सरकारी यंत्रणा इतर कामांच्या मोबदल्यात या बाबतीत काणाडोळा करतात. अनेक कामांच्या मोबदल्यात पालिकेचे सुमारे दोन हजार कोटी रुपये विविध सरकारी यंत्रणांकडून येणे बाकी आहेत.