‘कुठल्याही गोष्टीला पूर्णविराम असतो असे मानू नका. प्रश्न विचारा आणि उत्तराची आस ठेवा. गॅलिलिओसारखे बनून गोष्टींचे विश्लेषण करा. धार्मिक होण्याऐवजी विज्ञानवादी बना. नैतिकता धर्मामधून येते पण, तिला केवळ वैज्ञानिक आधार असला तरच तिचा स्वीकार करा,’ अशा शब्दांत विज्ञाननिष्ठ बनण्याचा सल्ला नोबेल पारितोषिक विजेते आणि बालकांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी मुंबईत ‘चिल्ड्रेन सायन्स काँग्रेस’मध्ये मुलांशी संवाद साधताना दिला.
मुंबई विद्यापीठातील ‘इंडियन सायन्स काँग्रेस’शी समांतर भरलेल्या या परिषदेत सत्यार्थी सहभागी झाले होते. पुस्तक प्रकाशित होते तेव्हा त्यामुळे ज्ञान प्रज्वलित होते. पण, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा जीवन संपते. म्हणून आपण हिसेंचा तिटकारा केला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आपला मुद्दा पुढे रेटला. ‘विज्ञान फक्त पैसे कमाविण्याकरिता नव्हे तर ज्ञान जोपासण्याकरिता शिका, असा सल्ला तरुण संशोधकांना देत, पालकांनीही आपल्या मुलांना धर्म किंवा जातीपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.