गणेशोत्सवात करोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी दक्षता समित्या व गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

मुंबई आणि परिसरातून काही लाख नागरिक रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आपल्या गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाच्या तयारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून तिन्ही जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

रायगड जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग गणेशोत्सवात फैलावू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. या काळात लोकांची ये-जा मोठय़ाप्रमाणात वाढणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ठिकठिकाणी तपासणी नाके अधिक सतर्क करावेत. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी. गणेश मंडळानीसुद्धा आपापल्या गावांत आरोग्य शिबिरे घ्यावीत, उत्सवाचे स्वरूप साधे ठेवावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. रायगडाची लवकरच कार्यान्वित होईल. जिल्ह्य़ांमध्ये विलगीकरणासाठी खाटा व इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात, रुग्णवाहिका पुरेशा राहतील याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.