News Flash

तिकीट तपासनीसाला सीएसटी स्थानकात मारहाण

हा प्रवासी आपण प्राप्तिकर विभागातील अधिकारी असल्याचा दावा करत होता.

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीच्या प्लॅटफॉर्मवर डय़ुटी करणाऱ्या तिकीट तपासनीसाने तिकीट विचारल्यानंतर त्याच्याशी हुज्जत घालून त्याला मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला.

हा प्रवासी आपण प्राप्तिकर विभागातील अधिकारी असल्याचा दावा करत होता. याबाबत तिकीट तपासनीसाने या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिकीट तपासनीसांवर हल्ला होण्याची ही चौथी घटना घडली आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४-१५च्या प्रवेशद्वाराशी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास तिकीट तपासनीस एस. के. गुप्ता डय़ुटी करत होते. त्यांनी ऋषीकुमार सिंह नावाच्या प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली. त्या वेळी त्याच्याकडे प्रवास तिकीट नसल्याचे आढळले.

‘आपण प्राप्तिकर खात्यात उच्चपदस्थ अधिकारी आहोत, कधीतरीच स्टेशनवर येतो,’ असे सांगत सिंह यांनी दंड भरण्यास नकार दिला.

या वादावादीदरम्यान ऋषीकुमार सिंह यांनी एस. के. गुप्ता यांच्या कानाखाली मारली. हा प्रकार घडल्यानंतर गुप्ता आणि त्यांचे सहकारी यांनी सिंह यांना  आपल्याबरोबर तिकीट निरीक्षकांच्या कार्यालयात चलण्यास सांगितले. त्यालाही ऋषीकुमार सिंह यांनी नकार दिला.

सरतेशेवटी सिंह यांना कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आले.  त्यांनी सिंह यांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुप्ता यांनी ऋषीकुमार सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास हुज्जत न घातला दंड भरला पाहिजे. पण यापैकी काहीच होत नसल्याने बिकट परिस्थिती आहे. डॉ. आलोक बडकुल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मध्य रेल्वे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 12:09 am

Web Title: beating to ticket checker in cst
Next Stories
1 कामाच्या ठिकाणी राहणाऱ्यांनाच घरभाडे भत्ता मिळणार
2 प्रभादेवी परिसरातील इमारतीला लागलेली आग आटोक्यात!
3 पालिका अधिकाऱ्याची बदनामी करणाऱ्यांविरुद्द अब्रुनुकसानीचा दावा?
Just Now!
X