मुंबईच्या अत्यंत जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा लवकरच कायापालट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माथेरानच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प आखला असून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे काम पावसाळ्यानंतर सुरू होऊन पुढील वर्षभरात पूर्ण होईल. ३५ ते ४० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून दस्तुरी ते माथेरान स्थानकापर्यंतचा रस्ता, विविध प्रेक्षणीय स्थळे आणि त्याभोवतीचा परिसर यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

माथेरानच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण यांचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे चार वर्षांपूर्वीच आला होता. पण माथेरान हा पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील प्रदेश असल्याने येथे काम करताना अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक होते. दस्तुरी ते माथेरान स्थानक हा रस्ता तयार करताना सिमेंट किंवा डांबराचा वापर करण्यास मनाई आहे. तसेच इतर ठिकाणीही रस्त्याचे वा इतर सुशोभीकरणाचे काम करताना माथेरानमधील नैसर्गिक घटकांचाच वापर करणे गरजेचे आहे. या मर्यादांमुळे प्रकल्पाची दिशा ठरवण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी गेला. आता या प्रकल्पाचा पूर्ण अहवाल आणि आराखडा तयार झाला असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून माथेरान-दस्तुरी या रस्त्याच्या कामासाठी माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याकडूनच माती वर पोहोचवली जाणार आहे. सिमेंटच्या ब्लॉकप्रमाणे या मातीचेही घट्ट ठोकळे करून पावसाळ्यात त्याचा चिखल होणार नाही, यासाठी त्यात काही नैसर्गिक घटक मिसळण्यात येतील. हे ठोकळे एका बाजूला एक लावून हा रस्ता तयार करण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याशिवाय येथील घोडय़ांसाठी तबेले उभारण्यासाठीही येथील लाकडाचा वापर होणार आहे. विविध पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करताना त्या पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्तेही मातीच्या ठोकळ्यांपासून बनवण्यात येणार आहेत. तसेच या स्थळांभोवती कुंपणे, पुष्पवाटिका आदी गोष्टी बांधण्यात येणार आहेत, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

ही निविदा प्रक्रिया येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर पावसाळ्यानंतर माथेरानच्या सुशोभीकरणाचे काम सुरू होणार असून वर्षभरात ते पूर्ण होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.