मोजक्या सौंदर्यवती सोडून अनेकींना बॉलीवूडमध्ये अपयश

विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धामध्ये ‘सौंदर्यसम्राज्ञी’चा किताब पटकाविलेल्या सौंदर्यसम्राज्ञी बॉलीवूडच्या पडद्यावर मात्र अपयशी ठरल्या आहेत. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच सौंदर्यसम्राज्ञींना बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे सौंदर्यसम्राज्ञींचा ‘तोरा’ फक्त सौंदर्यस्पर्धापुरताच मर्यादित राहिला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या विविध स्पर्धामधून भारतीय सौंदर्यवती मोठय़ा संख्येत सहभागी होत असून त्यांना स्पर्धेतून ‘सौंदर्यसम्राज्ञी’ हा किताबही मिळत आहे. सौंदर्यस्पर्धेत यश मिळाल्यानंतर या सौंदर्यसम्राज्ञींचा जाहिराती आणि बॉलीवूडच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर प्रवेश होतो. मात्र गेल्या काही वर्षांत अवघ्या एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सौंदर्यसम्राज्ञींनाच रुपेरी पडद्यावर मोठे यश मिळाले आहे. यात विशेषत्वाने सुश्मिता सेन (मिस युनिव्हर्स), ऐश्वर्या राय (मिस वर्ल्ड) आणि प्रियांका चोप्रा (मिस वर्ल्ड) यांची नावे घेता येतील. या तिघींनीही ‘सौंदर्यसम्राज्ञी’ हा बहुमान मिळविल्यानंतर जाहिराती आणि नंतर बॉलीवूडमध्ये प्रवेश केला व आपले स्थान निर्माण केले.

‘मिस इंडिया’ पूजा गुप्ता हिने ‘फालतू’ या एका चित्रपटात काम केले मात्र त्यानंतर ती दिसली नाही. ‘मिस इंडिया युनिव्हर्स’ सिमरन कौर मुंडी हिने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात काम केले होते. ‘फेमिना मिस इंडिया’ पूजा चोप्रा ‘कमांडो’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर अवतरली मात्र त्यानंतर सध्या ती कुठेच नाहीये. ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ वन्या मिश्रा ही ही ‘शेर’ या एकाच चित्रपटात दिसली होती. ‘मिस इंडिया वर्ल्ड’ नवनीत कौर ढिल्लनसुद्धा ‘लवशुदा’ या एकाच चित्रपटानंतर गायब झाली. ‘मिस इंडिया’ आदिती आर्य हिला काही मोजके चित्रपट मिळाले, पण तीही फारशी चमक दाखवू शकलेली नाही. यंदाची ‘मिस इंडिया वर्ल्ड’ प्रियदर्शनी चॅटर्जी ही बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत आहे.

राष्ट्रीय व अन्य काही स्पर्धामधून ‘सौंदर्यसम्राज्ञी’ ठरलेल्या पूजा चोप्रा, मनस्वी ममगई (अ‍ॅक्शन जॅक्सन), पूजा गुप्ता, नेहा हिंगे (लव्ह यू सोनियो),  निकोल फाडिया (यारिया), कनिष्ठा धनकर (फॅशन), इंदोर जोया अफरोज (द एक्स्पोज), रुही सिंह (कॅलेंडर गर्ल) यांनीही काही चित्रपटांतून भूमिका केल्या. पण त्यांनाही अपेक्षित असे यश मिळालेले नाही.  सौंदर्यस्पर्धेतून यश मिळविणे आणि बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर काम करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सौंदर्यस्पर्धेतील या विजेत्या बॉलीवूडच्या पडद्यावर अपयशी ठरतात, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.