शैलजा तिवले

तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत अपुऱ्या खाटा यामुळे केईएम रुग्णालयात ७० करोना रुग्ण खाटांच्या प्रतीक्षेत आहेत. गंभीर रुग्णांसाठी राखीव असलेल्या पालिकेच्या रुग्णालयांमधील खाटाही भरल्याने या रुग्णांना पाठवायचे कुठे, असा प्रश्न रुग्णालयांपुढे आहे.

तीव्र लक्षणे असलेल्या किंवा गंभीर करोना रुग्णांना केईएममध्ये दाखल केले जाते. या रुग्णालयात करोनाबाधितांसाठी सध्या ४१३ खाटा उपलब्ध आहेत. तसेच ९० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. सध्या रुग्णालयात सुमारे ३५० रुग्ण आणि उर्वरित संशयित रुग्ण दाखल असून सर्व खाटा भरल्या आहेत. मात्र, रुग्णांची गर्दी वाढतच आहे. चार दिवसांपासून ७० रुग्ण दाखल झाले असून त्यांना खाटा उपलब्ध नाहीत, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. केईएमच्या करोना कक्षाबाहेरच अनेक रुग्ण जमिनीवर दाखल करून घेण्याची वाट पाहत आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात रुग्णालय प्रशासनाने जुन्या इमारतीतील पहिला आणि दुसरा मजला असे एकूण आठ कक्ष १२ दिवसांत करोना रुग्णांसाठी सज्ज केले. येथे येणारे रुग्ण गंभीर असतील हे गृहीत धरूनच या सर्व कक्षांत ऑक्सिजनची सुविधाही निर्माण केली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात करोना रुग्णांसाठी २० खाटा होत्या. ही संख्या अपुरी पडेल असे गृहीत धरून चार आणि पाच अशा दोन साधारण कक्षांमध्ये अतिदक्षता विभाग उभा सज्ज करून तेथे आणखी ७० खाटांची व्यवस्था करण्यात आली.

‘थोडे बरे झालेल्या रुग्णांना करोना दक्षता केंद्र किंवा इतर रुग्णालयांमध्ये पाठविणे, नवीन कक्ष निर्माण करणे ही प्रक्रिया सुरूच असते. तरीही रुग्णसंख्येच्या वाढत्या ओघापुढे परिस्थितीला तोंड देणे अवघड होत आहे. ’ असे केईएममधील डॉक्टरांनी सांगितले.

पालिका ढिम्म

खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय होऊन ४८ तास उलटले तरी पालिकेने तातडीने हालचाल मात्र केलेली नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. याबाबत रुग्णालय प्रशासनांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

खासगी रुग्णालयातील तीन हजार खाटा पालिकेकडे

खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली असून यातून करोना आणि करोनाव्यतिरिक्त आजारांसाठी सुमारे तीन हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत. केंद्रीय माहिती संच तयार (डॅशबोर्ड) झाला असून शनिवारी रात्रीपासूनच रुग्ण पाठविण्यास सुरुवात होणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, शहरातील ४४ रुग्णालयातील खाटांचे नियोजन पालिकेकडे असणार आहे. रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील खाटा पालिकेकडे असणार आहेत. छोटय़ा नर्सिग होमचे नियंत्रण वॉर्ड पातळीवर केले जाईल. शक्यतो १०० हून अधिक खाटांची रुग्णालये घेण्याकडे पालिकेचा भर आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.