माझी दोन वर्षांची मुलगी दोन दिवसांपासून आई-आई म्हणून हाक मारतेय. पण तिची हाक ऐकणारी आईच या जगात नाही हे तिला कसे सांगणार, या प्रश्नाने सुधाकर बोर्डे व्याकूळ झाले आहेत. सोमवारी खारघर येथे पोलीस व्हॅनने धडक दिल्याने वर्षां बोर्डे या महिलेला जीव गमवावा लागला. परंतु अपघातानंतर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची मदत न करता अपघातास कारणीभूत असणाऱ्या पोलीस शिपायालाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बोर्डे यांचे नातेवाईक करीत आहेत.
सुधाकर बोर्डे पत्नी वर्षां हिच्यासह मोटार सायकलवरून जात असताना पाठीमागून आलेल्या पोलीस व्हॅनने धडक दिल्याने वर्षां यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सुधाकर बोर्डे हेही जखमी झाले. या अपघातानंतर त्यांना तात्काळ नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेला जबाब आहे तसा न नोंदविता त्यामध्ये बदल केल्याचा आरोप सुधाकर बोर्डे यांनी केला आहे. त्याचबरोबर गुन्हा दाखल करण्यापूर्वीच मृतदेहाचे शवविच्छेदनही डॉक्टरांच्या मदतीने पोलिसांनी केल्याचेही त्यांनी सांगितले. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला होता, मात्र सात तासांनंतर रात्री एकच्या दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, अपघात करणाऱ्या पोलीस शिपायाबाबत कोणतीही माहिती न देता संबंधित पोलीस शिपायाला वाचविण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप वर्षांचा भाऊ अनिरुद्ध कांबळे यांनी केला आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त ए. के. शर्मा यांना याबाबत विचारले असता, या प्रकरणाचा तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमानुसार पुढील कारवाई होईल, असे सरकारी उत्तर त्यांनी दिले.