करोना रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. काही ठिकाणी क्षेत्रीय रुग्णालये उभारून सुविधा निर्माण केल्या आहेत. आता रुग्णसेवेवर अधिक लक्ष देतानाच रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी येथे दिल्या.

मुंबईतील महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधला.

मुंबईतल्या रुग्णालयांची जबाबदारी असलेले अधिकारी प्रशांत नारनावरे, सुशील खोडवेकर, अजित पाटील, मदन नागरगोजे यांनी त्यांचे अनुभव कथन केले.

आता सुविधा मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत त्याचा वापर मात्र नियोजनबद्ध पद्धतीने झाला पाहिजे. शासनाने मोठय़ा प्रमाणावर सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामध्ये चांगली सेवा  मिळते, याबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, जेणेकरून मोठय़ा रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा ओढा कमी होईल आणि रुग्णालयांवरचा ताण देखील कमी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.