शुल्क २०० वरून थेट ९०० रुपये

मुंबई : खासगी रुग्णालयांचे न परवडणारे दर आणि पालिका रुग्णालयातील गर्दी यामध्ये घुसमट होणाऱ्या मध्यमवर्गातील रुग्णांना पालिकेच्या सशुल्क खाटांचा आसरा होता. मात्र आता खाटांच्या शुल्कात तब्बल सहापट वाढ होणार आहे. सध्या बिगरवातानुकूलित खाटांसाठी २०० रुपये प्रति दिन शुल्क असून यापुढे ते ९०० रुपये आकारण्यात येणार आहे, तर वातानुकूलित खाटांसाठी १२०० रुपये इतकी शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे. शुक्रवारी होत असलेल्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

महापालिका रुग्णालयांवर पडणारा रुग्णांचा अतिभार आणि रुग्णालयांच्या सोयी-सुविधांसाठी शुल्क मोजण्यास तयार असलेले रुग्ण या दोन्हीचा मध्यममार्ग म्हणून काही वर्षांपूर्वी सशुल्क खाटांची संकल्पना अमलात आणली गेली. सध्या कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ११ बिगरवातानुकूलित तर १९ वातानुकूलित खाटा आहेत. विलेपार्ले येथील डॉ. रू. न. कूपर रुग्णालयात ५१ खाटांना मंजुरी असून त्यातील पाच वातानुकूलित तर १० बिगर वातानुकूलित खाटा उपलब्ध आहेत. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात २५ खाटा सशुल्क आहेत.

महापालिकेचा वाढता खर्च तसेच सध्या आकारण्यात येणारे दर हे खासगी रुग्णालयांपेक्षा खूप कमी असल्याने तसेच रुग्णालयातील अद्ययावत सुविधांमुळे पालिकेचा रुग्णशय्येमागे होणारा वाढता खर्च विचारात घेऊन खाटांच्या शुल्कात वाढ करण्याचे प्रस्तावित केल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. यानुसार सध्या खाटांसाठी २०० रुपये प्रतिदिन शुल्क आहे. स्थायी समितीने मान्यता दिल्यास यापुढे रुग्णांना बिगरवातानुकूलित खाटांसाठी ९०० रुपये तर वातानुकूलित खाटांसाठी १२०० रुपये प्रति दिन मोजावे लागतील. मात्र बहुतांश सामान्य रुग्णांना हे दर परवडणारे नसल्याने या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे.