शिवसेना नेत्यांची भाजपाकडून अवहेलना केली जात असल्याने शिवसेनेचे मंत्री आणि आमदार नाराज आहेत. सध्या ते संभ्रामवस्थेत असून काय करावं हे त्यांना सुचत नाहीए. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पावर यांनी भाकित वर्तवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवार म्हणाले, संसदेत अविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधींनी आपल्या भाषणातून सर्वकाही जिंकलं होतं. मात्र, त्यांनी ते डोळे मिचकावणं केलं नसतं तर बरं झालं असतं. तिथेच थोडी गडबड झाली, त्यामुळे त्यांच्या कृतीत गांभीर्य नसल्याची टीका होऊ लागली. राहुल गांधींनी मोदींच्या घेतलेल्या गळाभेटीत काहीही चुकीच नव्हतं, असं मतही त्यांनी व्यक्त केले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, मुंबईत शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर पार पडले. यावेळी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान, छगन भुजबळ, उपाध्यक्ष नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ आदी नेत्यांची भाषणे झाली.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला मान-सन्मान द्यायला विसरू नका. अनेकांना असे वाटते की आपल्याला कोणी ओळखत नाही. मात्र, त्यांनी असे वाटून घेण्याचे कारण नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसच तुमची ओळख आहे. पक्षात पदे मिळाल्यानंतर स्वत:चे आर्थिक फायदे साधण्याचे प्रकार घडतात. यामुळे पक्ष बदनाम होतो त्यामुळे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. त्याचबरोबर संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before the assembly elections shiv sena will come out of the government says ajit pawar
First published on: 22-07-2018 at 08:23 IST