मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालकपद हवे होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसशी असणाऱ्या जवळकीमुळे मारियांची हीच महत्त्वाकांक्षा त्यांना भोवली. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तपदावरून मारियांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एसीबीकडून सध्या सिंचन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुनिल तटकरे आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ चौकशी सुरू आहे. त्यामुळे मारिया एसीबीचे महासंचालक झाले असते तर या सर्व चौकशीची सूत्रे त्यांच्या हातात आली असती. परंतु, मारिया यांची काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारशी असलेली जवळीक ध्यानात घेता त्यांच्याकडे एसीबीचे महासंचालकपद जाणार नाही यासाठी, तडकाफडकी बदलीचा घाट घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. साधारण पंधरा दिवसांपूर्वी राज्याच्या गृह मंत्रालयाकडून मारिया यांना तुम्हाला पुढील काळात कोणत्या विभागाची जबाबदारी सांभाळायला आवडेल, याबद्दल विचारणा करण्यात आली होती. तेव्हा मारियांनी त्यांना एसीबीचे महासंचालकपद हवे असल्याचे सांगितले होते.
राज्याच्या पोलीस महासंचालक पदानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद विशेष प्रतिष्ठेचे आणि गोपनीयीतेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण पद आहे. राज्याचे सध्याचे महासंचालक संजीव दयाल येत्या ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर एसीबीचे सध्याचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांना ज्येष्ठ्यतेनुसार हे पद मिळण्याची अधिक शक्यता आहे. दीक्षित यांच्यानंतर ज्येष्ठ्यतेच्याबाबतीत मारिया यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे दीक्षित पोलीस दलाचे महासंचालक झाल्यास एसीबीचे महासंचालकपद आपसूकच मारिया यांच्याकडे चालत आले असते. मात्र, आता मारियांना गृहरक्षक दलाचे महासंचालकपद दिल्यामुळे ते  एसीबी महासंचालकपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. आता मारियांच्याऐवजी या पदासाठी त्यांच्याच आयपीएस तुकडीतील सतीश माथूर, मीरा बोरवणकर आणि १९८० च्या आयपीएस तुकडीतील विजय कांबळे यांच्यात स्पर्धा आहे.