राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी १५ एप्रिल रोजी के लेले एकदिवसीय काम बंद आंदोलन रात्री आठ वाजता मागे घेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांवर आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. तर २२ एप्रिलपासून होणारे बेमुदत आंदोलनही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेतर्फे  देण्यात आली.

राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील आणि रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी आपल्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ७ एप्रिलपासून काळ्या फिती लावून काम करीत होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत गुरुवारी १५ एप्रिल रोजी २४ तास काम बंद आंदोलन करण्यात आले. मात्र दुपारी देशमुख यांच्याबरोबर संघटनेच्या शिष्टमंडळाची दृक्श्राव्य माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांनी संघटनेच्या सर्व मागण्यांबाबत आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेचे मुंबई प्रतिनिधी डॉ. रेवत कानिन्दे यांनी दिली. आठ दिवसांत या मागण्यांबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्र्यांनी संचालकांना दिले.