20 April 2019

News Flash

बेलासिस रोड कात टाकणार

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून वाहतुकीवर प्रचंड ताण पडू लागला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वाहने उभी करण्यासाठी जागा; मोठे पदपथ

दक्षिण मुंबईमधील मुंबई सेंट्रल परिसरातील एसटी आणि बेस्ट आगारासमोरून जाणाऱ्या जहांगीर बोमन बेराम मार्गाचा (पूर्वाश्रमीचा बेलासिस रोड) तब्बल २८ कोटी रुपये खर्च करून कायापालट करण्यात येणार असून तयार करण्यात आलेल्या आराखडय़ानुसार बेलासिस रोडवर वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था आणि पादचाऱ्यांकरिता मोठे पदपथ उभारण्यात येणार आहेत. तसेच शाळेजवळ विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

बेलासिस रोडच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच हा रस्ता कात टाकून नव्या रूपात दिसणार असून भविष्यात हा मुंबईमधील आदर्श रस्ता ठरेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून वाहतुकीवर प्रचंड ताण पडू लागला आहे. परिणामी रस्त्यांचीही मोठय़ा प्रमाणावर झीज होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील अनेक रस्त्यांच्या बांधणीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पालिकेने बेलासिस रोडच्या बांधणीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची बांधणी आंतरराष्ट्रीय दर्जानुसार करण्यात येणार असून त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असून पादचाऱ्यांसाठी सुसज्ज पदपथ उभारण्यात येणार आहेत.बेलासिस रोडसाठी २८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा वगळून १६ महिन्यांमध्ये हे काम कंत्राटदाराला पूर्ण करावे लागणार आहे, असे रस्ते विभागातील अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

First Published on September 1, 2018 3:37 am

Web Title: belalys road to be cut