पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गरीब वर्गासाठी मोफत अन्नधान्य योजनेला नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचे स्वागत केले आहे. या योजनेचा राज्यातील ७ कोटी लोकांना लाभ होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या तीन महिन्यात अन्न सुरक्षा योजना, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना व इतर योजनेंतर्गत गरीबांना मोफत व स्वस्त दरात एक कोटीहून अधिक लोकांना २ लाख १९ हजार ७७४ मेट्रिक टन अन्नधान्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती शिधावाटप विभागाचे नियंत्रक कैलास पगारे यांनी दिली.

करोना राथरोगाचा मुकाबला करण्यासाठी देशात व राज्यात २४ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्व उद्योग, व्यवसाय, बंद झाले. त्याचा मोठा फटका हातावर पोट असलेल्या मजूर वर्गाला बसला. रोजीरोटीचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) व दारिद्रय रेषेवरील (एपीएल) शिधापत्रिका धारक कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याचेवळी पंतप्रधांनांनीही एप्रिल ते जून असे तीन महिने मोफत तांदूळ व चणा डाळ देण्याची योजना जाहीर केली.  त्याचा गरीब वर्गाला मोठा दिलासा मिळाला.

मुंबई महानगर क्षेत्र परिसरात विविध योजनांतर्गत मागील तीन महिन्यात म्हणजे अप्रिल ते जून अखेपर्यंत मोठय़ा प्रमाणावर अन्न धान्य वाटप करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ५२ लाख १० हजार ६९ शिधापत्रिकाधारकांना १ लाख ५ हजार ८५० मेट्रिक टन गहू व तांदळाचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत ४५ लाख ५५ हजार ६२३ लाभार्थ्यांना १ लाख ८२६ मेट्रिक टन मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर ५ लाख ६८ हजार ३०७ एपीएल पत्रिकाधारकांना माफक दराने १२ हजार १६७ मेट्रिक टन गहू व तांदळाची विक्री करण्यात आली.  या परिसरातील ९९ हजार ५५६ स्थलांतरीत मजुरांना ९३१ मेट्रिक टन मोफत तांदळाचे वाटप करण्यात आल्याचे पगारे यांनी सांगितले.

मोफत अन्नधान्य योजनेची मुदत ३० जूनला संपत होती.  मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे आधीच मुदतवाढीची मागणी केली होती. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी त्यासंबंधी पत्रव्यवहार केला होता. पंतप्रधांनांनी या योजनेला दिलेल्या मुदतवाढीचे मुख्यमंत्रयांनी स्वागत केले आहे.