दिशा खातू

देवीच्या मूर्ती घडविण्यासाठी बंगालचे मूर्तिकार मुंबईत

दुर्गापूजा आणि नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या उत्सवासाठी देवीच्या मूर्ती घडवण्याकरिता बंगालहून केवळ मूर्तिकारच नव्हे तर मातीही मुंबईत आणण्यात आली आहे.

येत्या १४ ऑक्टोबरपासून दुर्गापूजेचा उत्सव सुरू होणार आहे. या उत्सवासाठी देवीची मूर्ती बनविण्यासाठी खास बंगाली मूर्तिकार शहरातील विविध कार्यशाळेत दाखल झाले आहेत. शिवाजी पार्क येथील कार्यशाळेत अठरा मूर्तिकार मूर्ती घडविण्याच्या कामात मग्न आहेत. अमित पाल हे त्यांचे प्रमुख मूर्तिकार आहेत. ते गीतकार अभिजीत भट्टाचार्य, राणी मुखर्जी इत्यादी प्रसिद्ध कलाकारांकरिताही मूर्ती बनवितात.

दुर्गा पूजेसाठी फक्त दुर्गा देवीची मूर्ती न ठेवता परंपरेप्रमाणे गणपती, लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती आणि कार्तिकेय इत्यादी मूर्तीं बसविल्या जातात. मूर्तिसाठी लागणारी माती गंगा नदीच्या पात्रातून आणली जाते. यंदा अमित पाल यांनी १० टन माती पश्चिम बंगालमधून आणली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी बांबूंचा साचा बनवला जातो. मग या साच्यात भाताचा पेंढा भरला जातो. मग यावर मातीचे एक-एक करत तीन थर चढवले जातात. यात चेहरा वेगळा बनवला जातो. नंतर चेहरा देहावर लावला जातो. काही वेळा मातीचे कपडे बनविले जातात. तर काही वेळा फक्त देह घडवून त्यावर साडी नेसवली जाते. शेवटी रंगकाम होते. मात्र डोळे रेखाटले जात नाहीत. महालयाच्या दिवशी सकाळी ४ वाजता डोळे कोरले जातात. या दिवशी चंडी-पाठ केला जातो. मग साडी, दागिने चढवले जातात. मुंगा, बनारसी सिल्कच्या साडय़ा देवीला नेसवल्या जातात.

बंगाली मूर्तिकारांचा ओढा

दुर्गापूजा उत्सव मुंबईतही मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे बंगाली मूर्तिकार दरवर्षी मुंबईत येत असतात. यंदाही अडीचशे बंगाली मूर्तिकार मुंबईत दाखल झाल्याची माहिती बंगाल क्लबच्या प्रसून रक्षित यांनी दिली. कारागीर यासाठी प्रति दिन ४०० रुपये ते १८०० रुपये आकारतात. प्रत्येक कार्यशाळेत साधारण ६ ते २० कारागीर असतात.