इस्त्रायलचे बॉलीवूडवरील प्रेम जुने असले तरी त्याची प्रचिती खुद्द इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेत्यानाहू यांच्या उपस्थितीत बॉलीवूडजनांना ‘याची देही, याची डोळा’ अनुभवता आली. भारत आणि इस्रायलच्या मैत्रीपूर्ण संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत गुरुवारी हॉटेल ताजमध्ये शालोम बॉलीवूड या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्यानाहू यांनी बॉलीवूडमधील कलाकारांसोबत सेल्फी घेतला. आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीतून करताना नेत्यानाहू यांनी बॉलीवूडला इस्रायलमध्ये आमंत्रण दिले. बॉलीवूडमधले कलाकार आणि इस्रायलमधील तंत्रज्ञान, पर्यटन स्थळांची सांगड घातल्यास मनोरंजन क्षेत्रात चमत्कार घडू शकेल, अशा भावनाही त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या.

प्यारे दास्तो नमश्कार, ही नेत्यानाहू यांच्या भाषणाची सुरुवात होती. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्रायल या जयघोषाने त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली. दोन्ही वेळेस उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून नेत्यानाहू यांना दाद दिली. कार्यक्रमादरम्यान भारत-इस्रायलची दोस्ती किती घटट आहे याची जाणीव दोन्ही देशांच्या जतनेला व्हावी या उद्देशाने नेत्यानाहू यांनीच पुढाकार घेत उपस्थित बॉलीवूडजनांसोबत सेल्फी घेतले. भारताच्या विकासात बॉलीवूड उद्योगाचा मोठा वाटा आहे. जगात बॉलीवूडचा दबदबा आहे. मीही भारतीय चित्रपटांचा, कलाकारांचा चाहता आहे. बॉलीवूड, भारतीय चित्रपट सृष्टीतली कल्पकता, सर्जनशीलता आणि इस्रायलमधील चित्रिकरणासाठी उत्कृष्ठ ठरतील अशी पर्यटनस्थळे, प्रगत तंत्रज्ञानाचा मेळ पडल्यास मनोरंजन विश्वात चमत्कार होईल. त्यामुळे बॉलीवूडमधल्या कलाकारांचे इस्रायलमध्ये स्वागत आहे, असे नेत्यानाहू यांनी यावेळी सांगितले.

नेत्यानाहू यांनी दिलेले आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले. माहिती-तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्रात एकत्रपणे पुढे जाता येईल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.  या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासोबत निर्माते सुभाष घई, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, श्वेता नंदा राय, दिग्दर्शक करण जोहर, ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर, दिग्दर्शक इम्तियाज अली, मधुर भांडारकर, अभिषेक कपूर, सारा अली खान आदी उपस्थित होते.