१ मेपासून ‘बेस्ट’च्या ५२ मार्गावरील बसगाडय़ा रद्द करण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक विरोधामुळे स्थगित करण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी मंगळवारी ‘मुलुंड पश्चिम ते महापे एल अ‍ॅण्ड टी’ या मार्गावर धावणारी बस क्र. ५१४ च्या बाबतीत मात्र तो निर्णय लागू नसावा असे वाटते. कारण सुमारे तास-सव्वातास बस- स्टॉपवर प्रवाशांनी वाट पाहूनही ही बस न आल्याने अनेक प्रवाशांना रिक्षा वा अन्य मार्गानी कामावर पोहोचावे लागले.
खरे तर ५१४ ही बेस्टची एकमेव बस मुलुंडहून महापे- एल अ‍ॅण्ड टी या मार्गावर धावते. महापे इंडस्ट्रियल एरियाचा हा भाग अनेक कंपन्या आणि कारखान्यांनी गजबजलेला आहे. तिथे मोठय़ा प्रमाणावर काम करणाऱ्या कामगारांना ही एकमेव बस घणसोली या त्यातल्या त्यात जवळच्या रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी उपलब्ध आहे. अन्यथा रिक्षावाल्यांचा मनमानीपणा सहन करत त्यांना हा प्रवास करावा लागतो. नवी मुंबई परिवहन सेवेची १३ क्रमांकाची बस ‘घणसोली ते नेल्को’ या मार्गावर सुरू असली तरी तिच्या फेऱ्या क्वचितच असतात. त्यामुळे तिच्यावर प्रवाशांना विसंबून राहता येत नाही. ५१४ क्रमांकाची ही एकमेव बसच तिच्या फेऱ्यांमध्ये कितीही अनियमितता असली तरी प्रवाशांना त्यातल्या त्यात सोयीची आहे.
सकाळी व संध्याकाळी कार्यालयांच्या वेळात या बसला भरपूर प्रवाशी असतात. दुपारच्या वेळी ही बस सुमारे पाच तास बंद असते. त्यावेळी या मार्गावर फारसे प्रवाशी नसल्याने ते उचितही आहे. मात्र, सकाळ-संध्याकाळ चांगली प्रवाशीसंख्या असूनही ही बस जाणूनबुजून तोटय़ात दाखवून बंद करण्याचा घाट बेस्ट प्रशासनाने घातला असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.
गेले काही दिवस तर सकाळ-संध्याकाळी तास- दीड तास प्रतीक्षा करूनही ही बस येत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. मात्र मुलुंड आगारातील अधिकाऱ्यांनी त्याकडे हेतुत: दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले होते; जेणेकरून प्रवाशी कंटाळून या बसचा नाद सोडतील आणि आपल्याला हा बसमार्ग बंद करता येईल. बेस्टने जाणूनबुजून सुरू केलेला हा छळ अनेक प्रवाशांनी बेस्ट प्रशासनाकडे तक्रारी करूनही कायमच राहिला आणि अखेर १ मेपासूून ५१४ ही बससेवा बंद करण्यात आली.
आता शिवसेना नगरसेवकांच्या आंदोलनानंतर ५२ बेस्ट बससेवा रद्द करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला असला तरी ५१४ बस मात्र सुरू करण्याच्या बाबतीत मात्र अळंटळं सुरू असल्याचे दिसते.
मार्ग तोटय़ात असल्याचा तपासणी अहवाल बेस्टच्या ज्या अधिकाऱ्यांनी दिला, त्यांनी नेमकी कोणत्या वेळी ही तपासणी केली, हे प्रवाशांना कळले तर बरे होईल.
कारण या मार्गावरील केवळ प्रवाशांकडेच नव्हे, तर बेस्टच्या चालक-वाहकांकडेही यासंदर्भात त्यांनी खातरजमा करून घेतली असती तर त्यांना खरी वस्तुस्थिती कळली असती.
तरी ‘मुलुंड ते एल अ‍ॅण्ड टी महापे’ या मार्गावरील ५१४ क्रमांकाची ही बससेवा त्वरित सुरू करावी आणि तिचे वेळापत्रक नीटपणे पाळले जावे,अशी प्रवाशांची मागणी आहे.