नवी मुंबई, ठाणे परिवहन उपक्रमांच्या बससेवेच्या तुलनेत तिकीट दर जास्त
आर्थिक संकट कोसळलेल्या बेस्टला नफा मिळवून देण्यासाठी बेस्ट प्रशासनाची खटपट सुरू झाली असली तरी ऐन उन्हाळ्यात बेस्टच्या वातानुकूलित बस गाडय़ांचा प्रवास प्रवाशांच्या खिशालाच हुडहुडी भरवत आहे. नवी मुंबई आणि ठाणे महापालिका परिवहन उपक्रमांच्या तुलनेत बेस्टच्या वातानुकूलित बस गाडय़ांचे दर प्रति किलोमीटरला अधिक असल्याने बेस्टच्या प्रवाशांवर अतिरिक्त भरुदड पडत आहे. त्यामुळे काही मार्गावर बेस्टचे प्रवासी ठाणे आणि नवी मुंबईच्या बस गाडय़ांनी प्रवास करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी गेल्या वर्षभरात दोनदा भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे काही वर्षांपूर्वीपर्यंत दोन किमीच्या अंतरासाठी मिळणारे २० रुपयाचे तिकीट सध्या ३० रुपयांवर पोहोचले. यामुळे बेस्टची प्रवासी संख्या मोठय़ा प्रमाणात घसरत जात आहे. यात सध्या ऐन उन्हाळ्यात बेस्टच्या वातानुकूलित बस गाडय़ांचा प्रवास इतर परिवहन उपक्रमांच्या तुलनेत महाग असल्याने प्रवासी संख्येत आणखी घट होण्यात भर पडत आहे.
याच धर्तीवर तिकीट दर वाढवून काहीच फायदा झालेला नसल्याने बेस्टच्या भाडेसूत्रातही बदल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यात काही दिवसांपूर्वी वातानुकूलित बस गाडय़ांचे भाडे स्वस्त करण्यात येणार असल्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. मात्र बेस्ट समितीने मंजूर केलेल्या या प्रस्तावाला पालिकेची मान्यता मिळालेली नाही.

बेस्टचा एसी प्रवास महाग का?
नवी मुंबई आणि ठाणे महापालिका परिवहन उपक्रमांत चालवण्यात येणाऱ्या वातानुकूलित बस सेवांत सर्व आर्थिक तूट पालिका भरून काढते. मात्र बेस्टच्या परिवहन उपक्रमाची सर्व आर्थिक तूट मुंबई महापालिकेकडून भरून काढली जात नाही. त्यामुळे बेस्टचा प्रवास इतर महापालिका परिवहन उपक्रमांच्या तुलनेत महाग असल्याचे सांगितले जात आहे.