News Flash

‘बेस्ट’चीही मुंबईसह अहोरात्र धाव

प्रशासन सज्ज; आज मध्यरात्रीपासून ‘मुंबई २४ तास’

(संग्रहित छायाचित्र)

प्रजासत्ताक दिनाच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच आज मध्यरात्रीपासून ‘मुंबई २४ तास’ होणार असून, या संकल्पनेला साकारण्यासाठी बेस्ट उपक्रमाचाही हातभार लागणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून चोवीस तास सुरू राहणाऱ्या मुंबईचा आढावा घेण्यात येणार असून आठवडय़ाभरात दिवसभर सेवा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

यासाठी मध्यरात्रीच्या वेळेत बेस्टने वातानुकूलित मिनी बसगाडय़ा चालवण्याची तयारी सुरू केली आहे. चार दिवस मुंबईचा आढावा घेतल्यानंतर त्याचा अहवाल तयार करूनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या बेस्टच्या सर्वसामान्य बसचे पाच किलोमीटरसाठी पाच रुपये आणि वातानुकूलित गाडीचे सहा रुपये भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. प्रवासभाडे कपात करण्यापूर्वी बेस्टचे प्रतिदिन सरासरी १९ लाख प्रवासी होते. त्यात वाढ होऊन ३४ लाखांपर्यंत प्रवासी संख्या पोहोचली. मात्र उत्पन्न काहीसे घटले. जास्तीत जास्त प्रवासी व उत्पन्न मिळवण्यावर सध्या बेस्ट उपक्रमाकडून भर दिला जात आहे.

मध्य रेल्वेवरील ‘सीएसएमटी’ येथून मुख्य मार्गावर शेवटची लोकल मध्यरात्री १२.३० वाजता सुटते, तर हार्बरवरील मध्यरात्री १२.४० आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट येथून मध्यरात्री १ वाजता लोकल सुटते. अन्य स्थानकांतूनही मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शेवटच्या लोकल या वेळेत बंद होतात. त्यानंतर लोकल नसल्याने त्याचा लाभ बेस्ट घेणार आहे.  सध्या मुंबईत साधारण पहाटे ६ वाजता पहिली बस सेवा सुरू होते. त्यामुळे ‘मुंबई २४ तास’ संकल्पनेत पहाटे चापर्यंत ठेवण्यात येणाऱ्या सेवेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच बस सेवा टप्प्याटप्प्यापर्यंत सहापर्यंत जोडण्याचा प्रयत्न असेल.

होणार काय?

‘मुंबई २४ तास’ संकल्पनेचा बेस्ट उपक्रमाला काही प्रमाणात फायदा होऊन प्रवासी व उत्पन्नात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच बेस्टने २४ तास सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या बेस्टच्या मध्यरात्री साडे बारा वाजेपर्यंत असणाऱ्या बस सेवा प्रथम मध्यरात्री २ पर्यंत चालवण्याचा विचार असेल. त्यानंतर मिळणारा प्रतिसाद पाहून त्या पहाटे चापर्यंत धावतील.

आढाव्यानंतरच..  ‘मुंबई २४ तास’ संकल्पनेतील मॉल्स, हॉटेल्स, मार्केट इत्यादी गर्दीच्या ठिकाणांचा चार दिवसांत आढावा घेतला जाईल. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहिला जाईल. लोकांकडून नेमक्या कोणत्या वाहतूक सेवांना प्राधान्य दिले जात आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी याची माहितीही आढाव्यात घेण्यात येईल आणि त्यानंतर २४ तास बेस्ट सेवा देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 1:40 am

Web Title: best also runs overnight with mumbai abn 97
Next Stories
1 करोना जंतुसंसर्गाच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळा, रुग्णालयांचीही मदत
2 तपासात हस्तक्षेपाचा आरोप
3 प्लास्टिक वेष्टन, बाटल्यांच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करा!
Just Now!
X