News Flash

‘बेस्ट’कडून माहिती घेण्यास महापालिका असमर्थ!

बेस्टकडे वारंवार विचारणा करूनही फेरीवाल्यांकडील वीजजोडणीची माहिती मिळत नसल्यामुळे अखेर शिरूरकर यांनी माहितीचा अधिकार कायद्याचा आधार घेतला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

अधिकाऱ्यावरच ‘माहिती अधिकारा’चा आधार घेण्याची वेळ

आपला आर्थिक डोलारा सावरण्याकरिता मुंबई महापालिकेकडे याचना करणाऱ्या ‘बेस्ट’कडून माहिती मिळविण्यासाठी पालिकेच्या मात्र नाकीनऊ येते आहे. एका प्रकरणात बेस्टने माहिती दिली नाही म्हणून पालिकेच्या एका उच्चाधिकाऱ्याला चक्क ‘माहिती अधिकारा’चा आधार घ्यावा लागला आहे!

दक्षिण मुंबईत रात्री उशिरापर्यंत विजेच्या झगमगाटात पदपथावर पथाऱ्या पसरून व्यवसाय करणारे अनधिकृत फेरीवाले पालिकेला डोकेदुखी बनले असून या अनधिकृत फेरीवाल्यांना विद्युतपुरवठा कसा करण्यात येतो याची विचारणा पालिका अधिकाऱ्यांनी ‘बेस्ट’कडे अनेक वेळा केली होती, परंतु बेस्टकडून पालिका अधिकाऱ्यांना उत्तरच मिळालेले नाही. अखेर पालिका अधिकाऱ्यांवर माहितीच्या अधिकाराचा आधार घेत पदपथांवरील फेरीवाल्यांकडील वीजपुरवठय़ाची माहिती मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे अर्ज सादर करण्याची वेळ ओढवली.

दक्षिण मुंबईमधील मोहम्मद अली रोड आणि आसपासच्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागत आहे. रस्त्यावरील वाहतुकीला पादचाऱ्यांचा अडथळा होत असून काही वेळा छोटे-मोठे अपघातही घडतात. त्यामुळे पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाने अनेक वेळा या परिसरातील पदपथांवरील फेरीवाल्यांवर कारवाई केली, परंतु कारवाई केल्यानंतरही फेरीवाले पुन्हा पदपथावर पथाऱ्या पसरत असल्यामुळे पालिका अधिकारी हैराण झाले आहेत. या फेरीवाल्यांचे स्टॉल संध्याकाळी दिव्यांच्या उजेडात उजळून जात असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फेरीवाल्यांना विद्युतपुरवठा कशा पद्धतीने करण्यात येत आहे, याबाबत विचारणा करण्यासाठी ‘बी’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी बेस्टला वर्षभरापूर्वी पत्र पाठवले होते.

बेस्टकडे वारंवार विचारणा करूनही फेरीवाल्यांकडील वीजजोडणीची माहिती मिळत नसल्यामुळे अखेर शिरूरकर यांनी माहितीचा अधिकार कायद्याचा आधार घेतला आहे. मोहम्मद अली रोडसह या परिसरातील तब्बल २५ रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडील वीजपुरवठय़ाबाबतची माहिती मिळविण्यासाठी शिरूरकर यांनी बेस्टकडे माहितीच्या अधिकारात अर्ज सादर केला आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांना बेस्ट उपक्रमाकडून विद्युतपुरवठा करण्यात येतो का? असल्यास त्याची कागदपत्रे उपलब्ध करावी आणि माहिती उपलब्ध करावी, अशी मागणी शिरूरकर यांनी या अर्जाद्वारे बेस्ट उपक्रमाकडे केली आहे.

तर त्याबाबतच्या परवानगीची प्रत, नसल्यास अनधिकृत वीज विकण्यात येत असेल तर त्याबाबत केलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध करावी, अशी मागणी शिरूरकर यांनी या अर्जाद्वारे बेस्ट उपक्रमाकडे केली आहे.

अनधिकृत वीजजोडणीकडे बेस्टचे दुर्लक्ष

फेरीवाल्यांना दुकानदार अनधिकृतपणे वीजजोडणी देत असल्याचे कारवाईदरम्यान पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. परंतु बेस्ट उपक्रमाचे याकडे लक्षच नाही. वीजचोरी अथवा अशा पद्धतीने अन्य व्यक्तीला वीज दिल्याचे निदर्शनास आल्यास बेस्टकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र या परिसरातील फेरीवाल्यांकडील वीजजोडणीबाबत तपासणी करण्यात येत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

पदपथ अडवणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल संध्याकाळी दिव्यांच्या प्रकाशात झगमगून जातात. या फेरीवाल्यांना विद्युतपुरवठा कशा पद्धतीने करण्यात आला याची विचारणा अनेक वेळा बेस्टकडे करण्यात आली. पण त्याचे उत्तर मिळू शकलेले नाही. या फेरीवाल्यांना काही दुकानदारांकडून वीजपुरवठा होत असून त्या बदल्यात दुकानदार फेरीवाल्यांकडून पैसे घेत आहेत. बेस्टची वीज विकणाऱ्या या दुकानदारांवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबतची माहिती बेस्टकडून मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज करण्याची वेळ ओढवली.

उदयकुमार शिरूरकर, साहाय्यक आयुक्त, ‘बीविभाग कार्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:15 am

Web Title: best bmc
Next Stories
1 बेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी दीड वर्षांपासून उपदानापासून वंचित
2 आणखी किती बळी जाणार?
3 ‘कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध आहे का?’
Just Now!
X